पाचगणीतील ग्लोबल डोंग शाळेची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

सिद्धेश्‍वर डुकरे -सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - पाचगणी येथील ग्लोबल डोंग शाळेची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत दिले. सदस्या मनीषा चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सवरा बोलत होते.

सवरा म्हणाले की, ""आदिवासी विद्यार्थ्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येतो. शाळांमध्ये या विद्यार्थ्यांचे विशेष तास घेण्यात येतात. अशा शाळा निवडण्याचे 26 वेगवेगळे निकष आहेत. त्यांची पूर्तता करणाऱ्या इंग्रजी शाळांत या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी सुरवातीचे तीन ते सहा महिने पूर्वतयारीची स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाते.''

सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील ग्लोबल डोंग या शाळेतील अकरा विद्यार्थ्यांना खरूज या त्वचाविकाराची लागण झाली होती. त्यांच्यावर संस्थेने तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार करून घेतले आहेत. तथापि या विद्यार्थ्यांना अस्पृश्‍यतेची वागणूक देण्यात आली किंवा कसे, याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत या संस्थेची फेरचौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळल्यास संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल, असे सवरा यांनी स्पष्ट केले. तसेच, यापुढे नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची निवडप्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल, अशी माहिती सवरा यांनी दिली.
 
Web Title: Global Dong school inquiry