एफआरपीसाठी कोर्टात जाऊ

एफआरपीसाठी कोर्टात जाऊ

सोमेश्वरनगर - सोमेश्वर कारखान्याने चालू हंगामातील एफआरपीची रक्कम पंधरा टक्के व्याजासह न दिल्यास कारखान्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत, असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला.

सोमेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामाची ८० टक्के म्हणजेच प्रतिटन २२२० रुपये इतकी एफआरपी दिली आहे. याबाबत काकडे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की सोमेश्वरने गेल्या तीन महिन्यांत ५ लाख ३५ हजार टन उसाचे गाळप केले असून, ११.७० टक्के साखर उतारा राखला आहे. ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना सोमेश्वरने ही रक्कम पूर्णपणे दिलेली नाही. याबाबत आम्ही तीन वेळा पत्र दिले होते, मात्र कार्यवाही झालेली नाही. दुसरीकडे मात्र वार्षिक सभा किंवा वर्तमानपत्रांतून एफआरपी एकरकमी देणार असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाला केंद्र सरकारकडून एफआरपीसाठी बिनव्याजी कर्ज किंवा वित्त साह्य योजनेचा लाभ घ्यायचा आहे. सभासदांना वेठीस धरण्यासाठी व गरज नसताना राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा घेण्यासाठी हे धोरण असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे.

असे कर्ज मिळाल्यानंतर एकाच वर्षात कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बांधणार असल्याची चर्चा आहे. या बांधकामासाठी कारखान्याने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया किंवा साखर आयुक्तांची परवानगी घेतली  नसल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. तसेच, कारखान्याने मागील वर्षी किंमत चढ-उतार निधी स्वरूपात २० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे; परंतु त्या निधीचा संचालक मंडळाने दुरुपयोग केला आहे. कोट्यवधींच्या कामांची साखर आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी घ्यावी लागू नये; म्हणून कारखाना छोटे छोटे अंदाजपत्रक तयार करून सभासदांची दिशाभूल करत आहे आणि अनावश्‍यक खर्च करत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतल्याशिवाय कामे करू नयेत, अशी मागणीही काकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com