

तात्या लांडगे
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस आता ‘ई-केवायसी’चे बंधन आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देऊनही ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांना ‘ई-केवायसी’ करून घेण्यासाठी एक महिन्याची संधी दिली जाईल. त्यासंदर्भात विभागाचे आयुक्त मंगळवारी (ता. ५) सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ३० हजार ५६३ महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. १ जुलै २०२४ पासून या सर्वांना दरमहा १५०० रुपये मिळाले. पुढे फेब्रुवारी २०२५ पासून निकषांनुसार प्रत्येक लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झाली. त्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येक लाभार्थी महिलेस लाभ सुरू ठेवायचा असल्यास ‘ई-केवायसी’ करावी लागेल, अशी अट घातली.
सुरवातीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर पुढे ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढविली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमुळे ई-केवायसी न केलेल्यांनाही लाभ मिळाला. त्यामुळे अनेक महिलांनी मुदतीकडे दुर्लक्ष केले आणि ‘ई-केवायसी’ केलीच नाही. सोलापूर जिल्ह्यात सुमारे दीड लाख तर राज्यभरातील अंदाजे १७ लाख महिलांची ई-केवायसी राहिली आहे.
दुरुस्तीसाठी आज शेवटचा दिवस
दुसरीकडे ‘ई-केवायसी’ केली, पण त्यात चूक झाली, अशा महिलांची संख्या सोलापूर जिल्ह्यात ९८ हजार २१ आहे. या बहिणींनी ‘तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरदार आहे का?’ याचे उत्तर ‘हो’ असे निवडले. योजनेसाठी त्या महिला अपात्र ठरू नयेत म्हणून त्या सर्वांना दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.
नाराजी सरकारला परवडणारी नाही
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ३० हजार आणि राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते, सुरवातीचे काही महिने सर्वांनाच लाभ देखील मिळाला. मात्र, आता ‘ई-केवायसी’ची आणखी एक संधी न देता १७ लाख महिलांचा लाभ बंद करणे, राज्य सरकारला परवडणारे नाही. त्यामुळे निश्चितपणे अशा महिलांना एक संधी मिळेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती
सुरवातीच्या लाभार्थी
११,३०,५६३
ई-केवायसी चुकलेल्या महिला
९८,०२१
अपात्र ठरलेल्या अंदाजे महिला
२.६७ लाख
ई-केवायसी राहिलेल्या महिला
१.२७ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.