आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; सरकारकडून मिळणार विमा कवच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खूशखबर असून आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अदिवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खूशखबर असून आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अदिवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.

आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित आश्रमशाळा, वसतिगृह, नामांकित शाळा अशा विविध योजनांतर्गत राज्यातील एकुण 5.50 लाख आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने आज डॉ. फुके यांनी सर्व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांच्याशी आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आरोग्य व जीवन विमा कवच कशा पध्दतीने देता येईल याबाबत सखोल चर्चा केली आहे.

सद्य परिस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनामार्फत दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान मदत म्हणून दिली जाते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येतात. अपघाती कारणास्तव विद्यार्थ्यांचा मृत्यू ओढवतो अशा वेळी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य म्हणून विमा कवच असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरवले असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य शासनामार्फत समाजातील इतर घटकांना विमा कवच उपलब्ध करुन देण्याबाबत विविध योजना उपलब्ध आहेत त्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांनादेखील विमा कवच आवश्यक असल्याचे मत डॉ. फुके यांनी यावेळी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for tribal students; Insurance will get from the government