प्रश्न सोडवा, बडगा दाखवू नका - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यात सध्या शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज सरकारला लगावला.

मुंबई - राज्यात सध्या शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज सरकारला लगावला.

'सातव्या वेतन आयोगाबरोबरच इतर अनेक मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. आधीच मराठा समाजाची आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांची त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलने सुरू आहेत. त्यात आता राज्य सरकारी कर्मचारीही संपावर गेल्याने राज्याचे समाजमन अस्वस्थ आहे,'' अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

'सर्वच राज्यकर्त्यांच्या निवडणूक जुमलेबाजीचे हे परिणाम आहेत. "गरिबी हटाव'पासून "अच्छे दिन'च्या घोषणा पूर्ण झाल्या असत्या, तर लोकांच्या असंतोषाचा असा भडका उडाला नसता. सत्तेवर येण्याआधी थापा मारल्या गेल्या, लोकांना फसवले गेले, त्याचेच परिणाम सगळे भोगत आहेत. देश अशा जुमलेबाजीमुळे खड्ड्यात गेला आहे,'' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'राज्यात आज शेतकरी, सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. त्याला आंदोलन न समजता न्याय्य हक्कांचा लढा मानायला हवा. रोजगार, रोजीरोटी या न्याय्य हक्कांसाठीही लोकांना रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर हा देश भविष्यात नक्की कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. त्यासाठी या लोकांचे प्रश्न सहानुभूतीने सोडवायला हवेत.''

वेतन आयोगाची मागणी योग्य
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही रस्त्यावर उतरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी योग्यच आहे, असे ठणकावून सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, ""त्यांचा संप चिघळण्याआधीच मिटवा. तुमचा कारवाईचा बडगा व दंडुके सध्या लांबच ठेवा. ही सर्व महाराष्ट्राची जनता आहे. मंत्रालयात राज्यकर्ते हे "टेम्पररी' आहेत. सरकारी कर्मचारी कायम आहेत. म्हणूनच त्यांच्या मागण्यांचा विचार करा आणि तुमच्या जुमलेबाजीला एकदाचा पूर्णविराम द्या. कारण निवडणूक आयोग आणि न्यायालयही जुमलेबाजीला फटके देत आहे.''

Web Title: Government employee farmer agitation issue Uddhav thackeray