स्टेन्ट आवाक्‍यात; तरीही खर्च भरमसाट

स्टेन्ट आवाक्‍यात; तरीही खर्च भरमसाट

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये संजीव रंगराव या रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधल्यानंतर गरज नसताना दोन स्टेन्टचा वापर होत असल्याचे उघडकीस आले. हृदयविकारात अँजिओग्राफीनंतर रक्तातील अडथळ्यानुसार कोणत्या आकाराची स्टेन्ट वापरायची हे ठरते. मुद्दाम आखूड स्टेन्ट खरेदी केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. दोन स्टेन्टने एकीकडे खर्च वाढत असताना आयुष्याची जोखीमही वाढवली जाते. सरकारने किंमती निश्‍चित केल्यावर काही कंपन्यांनी देशाच्या बाजारपेठेतून आपले स्टेन्ट उत्पादन काढून घेतले. काही खासगी आणि नागपूरच्या सुपर स्पेशालिटीत ॲन्जिओप्लास्टी करताना काही अंशी लांब स्टेन्ट उपलब्ध असताना दोन स्टेन्टचा वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

सरकारी रुग्णालयात एक स्टेन्ट अँजिओप्लास्टीचा खर्च ६० हजार (दारिद्य्ररेषेखालील रुग्ण असल्यास मोफत), तर खासगी रुग्णालयात एक लाख ६० हजार, दोन स्टेन्टसाठी दोन लाखांचा खर्च येतो. महात्मा फुले योजनेतून मंजूर प्रकरणात रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधून योजनेतून मंजूर निधीव्यतिरिक्त वेगळे २५ ते ३० हजार रुपये एका शस्त्रक्रियेमागे आकारण्यात येतात. 

पुण्यात खर्च कायम
स्टेन्टच्या किमतीला लगाम घालण्यापूर्वी पुण्यात एक स्टेन्टच्या अँजिओप्लास्टीचा खर्च दीड ते दोन लाखांपर्यंत असायचा. आताही आवश्‍यक साहित्याची किंमत कमी झालेली नाही, असे पुण्यातील रुग्णालयांतर्फे रुग्णांना सांगण्यात येते.  

स्टेंटची देत नाहीत माहिती
कोल्हापूरमध्ये रुग्णालयाकडून बिल हातात पडल्यावर स्टेन्टची किंमत कळते, असे रुग्ण सांगतात. बहुतांश रुग्णालयात शस्त्रक्रियेअगोदर स्टेन्ट अन्‌ इतर साधनांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे अँजिओप्लास्टीमध्ये नेमकी कोणती स्टेन्ट वापरली, हे रुग्णाला समजण्यास मार्ग नाही. 

जळगावमध्ये वाढली फी
जळगावमध्ये आता अँजिओप्लास्टीनंतर रुग्णांना दीड ते दोन लाखांपर्यंत बिल हातावर टेकवले जाते. रुग्णालयांकडून सरकारच्या स्टेन्टच्या निश्‍चित किंमतीचा आदर केल्याचा देखावा करतानाच डॉक्‍टरांच्या तपासणी आणि उपचार शुल्कात वाढ झाल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. म्हणजेच ३२ हजारांची स्टेन्ट बसवण्यासाठी एक लाखांपर्यंत शुल्क आकारले जाते. 

सोलापूरमध्ये नियम धाब्यावर
सोलापूमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. शहर-जिल्ह्यातील बहुतांशी खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून स्टेन्टची तिप्पट ते चौपट रक्कम आकारतात. सरकारचे नियम धाब्यावर बसवले  जातात.

औरंगाबादमध्ये ‘पॅकेज’ तेजीत 
औरंगाबादमध्ये रोखीने अथवा योजना-विम्याचे संरक्षण नसलेल्या अँजिओप्लास्टीमध्ये स्टेन्टच्या किंमतीवरील बंधनांमुळे ‘पॅकेज’मध्ये फरक पडलेला नाही. स्टेन्टच्या किंमती कमी दाखवून इतर खर्च वाढवतात, परिणामी खर्च कमी झालेला नाही. महागड्या स्टेन्टसाठी विमा ‘पॅकेज’व्यतिरिक्त पैसे घेतल्याच्या अनेकदा तक्रारी होतात. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. 

कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) अँजिओप्लास्टी मोफत होते. सर्वोत्तम स्टेन्ट वापरण्यात येते. त्याचे पैसे रुग्णांकडून घेत नाही. हृदयविकारात रक्तवाहिनी आकुंचन पावते. ती खुली केली जाते. पुन्हा ती आकुंचन पावू नये म्हणून स्टेन्ट वापरला जातो. 
- डॉ. विदूर कर्णिक, असिस्टंट प्रोफेसर

रुग्णांच्या हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये एकापेक्षा अधिक ‘ब्लॉकेजेस्‌’ असल्यास स्टेन्ट वापरले जातात. मात्र केंद्राच्या नॅशनल प्राईज ॲथॉरिटीने (एनपीए) एका स्टेन्टची किंमत निश्‍चित केली असल्याने त्यापेक्षा जास्त किंमत सरकारी अथवा खासगी रुग्णालयात वसूल केली जाऊ शकत नाही. मात्र अँजिओप्लास्टी करण्यासाठी जी उपकरणे अथवा साहित्य वापरले जाते, त्याचे प्रमाण कमी-अधिक असल्याने शस्त्रक्रियेचा खर्च वाढतो.
- डॉ. अतुल पाटील
(संदर्भ सेवा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे कॉर्डिऑलॉजिस्ट, नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com