esakal | शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त; आरोग्यमंत्र्यांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : शासकीय रुग्णालयांमध्ये समाजातील गरजू व्यक्ती उपचार घेतात. त्यांना अचानक रक्ताची आवश्यकता भासल्यास तात्काळ रक्ताची बॅग विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे शासकीय दवाखान्यातील रुग्णांना मोफत रक्त देण्याचा निर्णय राज्य सरकारने (state government) घेतला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात ते आज बोलत होते.

जिल्ह्यात ४५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या राजर्षी शाहू ब्लड बँक (blood bank) संस्थेने नवीन वास्तू उभारली आहे. या वास्तूचे उद्घाटन आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व्ही.बी. पाटील यांनी केले.‌ आपल्या मनोगतात त्यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच खासगी ब्लड बँक भेटवस्तूचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करतात व पुणे मुंबईमध्ये चढ्या दराने रक्ताची विक्री करतात त्यांच्या रक्त संकलनाचा जिल्ह्याला कोणताही फायदा होत नाही याला सरकारने आवर घातला पाहिजे. अशी तक्रार केली.

हेही वाचा: थ्री टी प्लस व्हॅक्सिन धोरण राज्यभर राबवणार; राजेश टोपेंची माहिती

यावेळी मंत्री टोपे म्हणाले, ‘रक्ताची गरज किती असते हे रुग्णालयात गेल्याशिवाय कळत नाही. आजही शासकीय रुग्णालयांमध्ये असे गरजू रुग्ण असतात ज्यांना रक्ताची बॅग विकत घेणे शक्य नसते. यासाठी शासनाने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. खासगी ब्लड बँकांनाही शासनाने नेमून दिलेल्या नियमाच्या चौकटीतच काम करावे लागेल. जो कोणी नियमाविरुद्ध काम करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

कोल्हापुरात (kolhapur) कोरोना उशिरा सुरू झाला. त्यामुळे तो उशिरा संपणार, आता पुरेसे दिवस झाले आहेत. लवकरच तो कमी होईल. कॉंटॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण, लसिकरण हाच कोरोना कमी करण्याचा उपाय आहे. शाहू ब्लड सेंटरच्या कार्याबद्दल मंत्री टोपे म्हणाले, 'ही शाहूंची भूमी आहे. या मातीत समतेचा यशस्वी प्रयोग झाला. तो सर्वांना मार्गदर्शक आहे. शाहू ब्लड सेंटरमधून याच विचाराचे कार्य गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कार्याला सलामच आहे. त्यांना लागेलती सर्व मदत राज्य शासनाकडून मिळवून देऊ.'

अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, 'राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा विचार मांडला, त्याला कृतीमध्ये आणले. सर्वांना सर्व सुविधा समान मुल्याममध्ये आणि सारखेरपणाने मिळतील तेव्हाच खऱ्या अर्थाने समता येईल. शाहू ब्लड बँकेने याची सुरुवात केली आहे. त्यांनी सर्वांना शुद्ध आणि माफक किंमतीत रक्त पुरवले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या समारंभाला आमदार ऋतुराज पाटील, महेंद्र परमार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी महापौर आर.के.पोवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: 'कर्तृत्व’ कुठे कमी पडले ? ऐतिहासिक निकालात 20 जणांच्या दांड्या

ज्यांना शक्य आहे त्यांनी लस विकत घ्या - मुश्रीफ

शाहू ब्लड बँकेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमूख उपस्थिती होती. यावेळी मुश्रीफ म्हणाले,‘राज्यात कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आणि मृत्यू दर सर्वाधिक आहे. पण त्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नाही. मागणी एवढा पुरवठा झाला पाहिजे. बँका, औद्योगिक वसाहतीतील कारखाने, खासगी आस्थापना यांनी खासगी कोट्यातून लस विकत घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी विकत घेऊन लस घ्यावी. त्यामुळे शासकीय व्यवस्थेवरील ताण कमी होईल.

loading image