esakal | थ्री टी प्लस व्हॅक्सिन धोरण राज्यभर राबवणार; राजेश टोपेंची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

थ्री टी प्लस व्हॅक्सिन धोरण राज्यभर राबवणार; राजेश टोपेंची माहिती

थ्री टी प्लस व्हॅक्सिन धोरण राज्यभर राबवणार; राजेश टोपेंची माहिती

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : थ्री टी प्लस व्हॅक्सिन (3 T vaccination) अर्थात ट्रेसिंग, ट्रॅकींग आणि ट्रीटमेंट अधिक लसीकरण हे धोरण राज्यभर (maharashtra) राबविण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी तिप्पट ऑक्सिजनची गरज भासणार आहे. त्यामुळे जुलै अखेर ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याचे उद्दीष्ट आहे. तिसऱ्या लाटेतही उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरू राहण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे नियोजन करण्याच्या सुचना आजच सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्या झालेल्या व्हिसीमध्ये देण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश (rajesh tope) टोपे यांनी दिल्या आहेत.

आरोग्य मंत्री टोपे आज कोल्हापूर जिल्हा (kolhaupr district) दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातूनच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकांत व्हिसीद्वारे सहभाग घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य, जिल्हा आणि कोरोनाची स्थिती, तिसरी लाट, व्यापारी उद्योग, यांसह इतर विषयांवर तब्बल २५ हून अधिक मिनिटे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यासह जिल्ह्याने कोणती दक्षता घ्यायची आहे, आणि सद्यस्थिती काय आहे याची माहिती दिली.

हेही वाचा: आराेग्यमंत्री येताच कोल्हापुरात अधिका-यांची झाली धावाधाव

राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्ही रेट (positive rate) आणि डेथ रेशो अधिक चिंतेचा आहे. त्यामुळे मी स्वतः उपमख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी कोल्हापूरला भेट दिल्यानंतर दिलेल्या सुचनांचे पालन प्रशासनाने केले आहे. त्यामुळेच आरटीपीसीआरचा (RT-PCR) पॉझिटीव्हीटीचा दर कमी झाला आहे. येथून पुढे काय दक्षता घ्यायची याच्याही सुचना प्रशासनाला दिल्या आहेत, पुढील तीन आठवड्यात येथील स्थिती आटोक्यात येईल असे सांगून त्यांनी राज्याचा आढावा घेतला.

मंत्री टोपे म्हणाले, 'येथून पुढे ही थ्री टी प्लस व्हॅक्सीन याच अधारे कोरोना स्थिती अटोक्यात आणण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात तिसऱ्या लेटेचा मोठा धोका होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी पंतप्रधान यांनी ट्रेसिंग करा, ट्रॅकिंग करा, आणि ट्रीटमेंट द्या, असा सल्ला दिला आहे. ट्रेसिग करून रुग्णांना वेळीच कोरोनोची जाणीव करून द्या, होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांना दिवसांतून तीन वेळा संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घ्या, त्यांच्यावर वेळेत उपचार करा, यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या कॉल सेंटरचीही मदत घ्या, असेही पंतप्रधान यांनी सुचित केले आहे. तसेच जास्तीत जास्त व्यक्तींचे दोन्ही डोस पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी आजही लसीकरण जादा होण्यासाठी लसीची आवश्यकता असल्याचे व्हिसी दरम्यान सांगितले आहे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे, त्या जिल्ह्यांना अधिक लशी देण्याचे, त्यांना झुकते माप देण्याची आमचीही इच्छा आहे. त्या पद्धतीने येथून पुढील काळात होईल, असे नियोजन सुरू आहे.'

तिसऱ्या लाटेमध्ये उद्योग-व्यापार बंद राहू नये यासाठी उद्योगांच्या ठिकाणीच कामगारांची सोय करावी. त्यांना डोस देण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, यासाठी बैठका घेवून प्रबोधन करण्यात येणार आहे. सध्या तिसरी लाट कोल्हापुरात नाही, मात्र दुसरीही लाट अजून संपलेली नाही. काही ठिकाणी सुक्ष्मपद्धतीने ही लाट येत असल्याचे अहवाल आहेत, अशा ठिकाणी तातीडने उपचार आणि टेस्टींगच्या सुचना दिल्या आहेत.

हेही वाचा: कोल्हापुरात सोमवारपासून दुकाने सुरु होणार; टोपेंचे संकेत

कोल्हापुरी पॅटर्न राज्यभर राबवणार

कोल्हापुरातील उद्योजक हे त्यांच्या कडील कामगारांचे लसीकरण खासगी हॉस्पीटलच्या माध्यमातून तेथेच कॅम्प लावून घेत आहेत. ही पद्धत अतिशय चांगली असून हाच कोल्हापूर पॅटर्न राज्यभर राबवण्याचे आवाहन मी करतोय. यासाठी सीएसआर चा निधीही त्यांनी खर्च केला तरीही हरकत नाही. मात्र कोल्हापुरातील ही स्थिती कामगार मंत्री असेलल्या हसन मुश्रीफ यांनी मला सांगितली आणि राज्यभर राबवली पाहिजे म्हणजे धोका कमी राहिल असेही मंत्री टोपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

loading image