सरकारच्या अस्थिरतेची मंत्रालयात चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेना-भाजपची युती तुटल्याचे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना मध्यावधी निवडणुकीची शक्‍यता वर्तवली आहे. पवार यांच्या वक्‍तव्याचे पडसाद सरकारच्या स्थिरतेवर पडले आहेत. सरकार डळमळीत होणार का? याची चर्चा सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री आस्थापनेवरील "ओएसडी', खासगी सचिव यांच्यात रंगली आहे. 

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना भाजपसोबत युती करणार नाही, असे जाहीर केले. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी मध्यावधी निवडणुका होणार, असे भाकीत केले. त्यामुळे शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार, केव्हा बाहेर पडणार, सरकार अल्पमतात येणार का? तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जाणार का? असे अनेक सवाल सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मंत्री आस्थापनावरील अधिकारी- कर्मचारी सध्या विचारत आहेत. त्यातच शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी "बॅगा भरून तयार आहे. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो,' अशा आशयाची जाहीर विधाने केली. त्यामुळे या चर्चेत आणखीन भर पडत आहे. 
शिवसेना तसेच भाजप मंत्र्यांच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचारी त्यांच्या मूळ विभागात रिक्‍त जागांची सामान्य प्रशासन विभागाकडे चौकशी करीत आहेत. भाजपच्या एका मंत्र्याचे खासगी सचिव म्हणाले, की मुंबई महापालिकेत जिंकल्यावर दबाव वाढल्याने शिवसेना स्वतः बाहेर पडेल तर हरल्यावर भाजपच शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवेल. त्यामुळे काहीही झाले तरी सरकार अस्थिर होणार आहे. परिणामी आम्हाला मूळ विभागात जाण्याचा विचार करावाच लागणार आहे. 

Web Title: Government uncertainties discussed in the Ministry