‘आधार’ लिंक नसल्याने भूकबळी 

‘आधार’ लिंक नसल्याने भूकबळी 

मोताळा (जि. बुलडाणा) - ‘आधार’अभावी कुणीही शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याला २४ तास उलटत नाहीत तोच ‘आधार’ लिंक नसल्याने धान्य मिळाले नाही म्हणून बुलडाणा जिल्ह्यात एका ६५ वर्षिय वृद्धाचा अन्नाअभावी भूकबळी गेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा बापुना गवई (६५) व पंचफुला गोविंदा गवई (६१) यांचे रेशनकार्ड अंत्योदय योजनेत समाविष्ट आहे. हे कुटुंब भूमिहीन असून, त्यांना अपत्य नाही. दोन-तीन बकऱ्यांच्या संगोपनावर या दांपत्याच्या संसाराचा डोलारा आहे. गावातील स्वस्त धान्य दुकानदाराने मागील दोन महिन्यांपासून त्यांना आधार कार्ड लिंक नसल्याने रेशनचे धान्य दिले नसल्याचे पंचफुला गवई यांनी सांगितले. घरात अन्नाचा कण नसल्याने गवई दाम्पत्याने संबंधित रेशन दुकानदाराला खूप विनंती केली. मात्र, त्यांनी धान्य दिले नाही. गोविंदा गवई सतत तीन दिवस उपाशी राहून रेशनकार्डला आधार लिंक करण्यासाठी फिरले. दरम्यान, सततच्या उपासमारीने गोविंदा गवई यांचा २२ सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठीही त्यांना रेशनचे धान्य मिळाले नाही. ‘‘संबंधित पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे उपासमारीने पतीचा जीव गेला असून, संबंधित पुरवठा विभाग व रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. तसेच शासनाकडून मदत मिळावी,’’ अशी मागणी गोविंदा यांच्या पत्नी पंचफुला गवई यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. 

या प्रकाराची माहिती मिळताच आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने मोताळा तहसील कार्यालय गाठून पंचफुला गवई यांची विचारपूस केली व तहसील प्रशासनाला धारेवर धरले. या भूकबळीच्या प्रकाराने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. 

भूकबळी होऊ नये म्हणून शासनाने गरिबांसाठी अंत्योदय व अन्न सुरक्षा योजना सुरू केली. मात्र, सध्याच्या सरकारने रेशनकार्ड ऑनलाइन लिंक झाल्याशिवाय धान्य देऊ नये, असे आडमुठेपणाचे धोरण अवलंबवले आहे. या धोरणामुळे भूकबळीचा प्रकार घडला आहे. मोताळा तहसील कार्यालयाच्या कारभाराची जिल्हाधिकारी व आयुक्तांनी दखल घेऊन येथील कारभारात सुधारणा करावी. 
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे आमदार, बुलडाणा 

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. 
- सुनील विंचनकर, उपविभागीय महसूल अधिकारी, मलकापूर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com