शिवस्मारकाचे भूमिपूजन हा स्टंट- राज ठाकरे

विक्रांत मते : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

अख्खे महाराष्ट्र राज्य शिवछत्रपतींचे आहे, महाराजांचा खरा इतिहास गड-किल्ल्यांमध्येच असल्याने स्मारकाची गरजचं काय? त्यापेक्षा सरकार जो निधी स्मारकावर खर्च करणार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने गड व किल्ल्यांचे संवर्धन होऊ शकते.

- राज ठाकरे

नाशिक : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे भूमिपूजन हा राज्यातील भाजप सरकारचा फक्त निवडणूक 'स्टण्ट' आहे. राज्यात अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. अपूर्ण प्रकल्पांना निधी अपुरा पडतं असताना शिवस्मारकासाठी सरकारने निधीची घोषणा केली आहे. मुळात सरकारकडे पैसे नाही तर शिवस्मारक कोणत्या पैशांतून उभे करणार असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. नुसते आकडे सांगायचे करायचे मात्र काहीच नाही असा उद्योग सरकारकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध विकास कामांच्या उदघाटनासाठी नाशिक मध्ये आलेल्या राज यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी सरकारने तीन हजार कोटी रुपयांची घोषणा केली. परंतु राज्य सरकारकडे पैसे नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत विकासासाठी सहा हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्यापही निधी दिला नाही.

लोकांना विसरून जाण्याची सवय असल्याचे सरकारला पक्के ठाऊक असल्याने थापा मारण्याचे उद्योग चालविले आहे. कुठे जा घोषणा करण्याचे काम सध्या सुरू आहे. स्मारकाच्या उदघाटनासाठी किल्ले, गडांची माती व विविध जिल्ह्यांतून नद्यांचे पाणी आणून भपकेबाजपणा करण्यात आला. स्मारकासाठी तीन हजार कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. परंतु सरकारकडे पैसे नाही. सरकारने तीन हजार कोटींची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात दहा हजार कोटींहून अधिक खर्च लागण्याची शक्‍यता आहे. मुळात राज्यात विविध प्रकल्प प्रलंबित आहे ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पैसे नसताना स्मारकासाठी कोठून निधी आणणार असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

अख्खे महाराष्ट्र राज्य शिवछत्रपतींचे आहे, महाराजांचा खरा इतिहास गड-किल्ल्यांमध्येच असल्याने स्मारकाची गरजचं काय? त्यापेक्षा सरकार जो निधी स्मारकावर खर्च करणार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने गड व किल्ल्यांचे संवर्धन होऊ शकते. गड व किल्ले हेच छत्रपतींचे खरे स्मारक आहे त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्यांनी दिला. निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा स्टण्ट आहे. नुसते आकडे सांगायचे करायचे मात्र काहीचं नाही. यापूर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी घोषणांचा पाऊस पाडण्याचे उद्योग केले तेच उद्योग आता भाजप सरकार करतं असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: govt only talks, but does nothing, blames raj thackeray