
Graduation Admission : पदवीला प्रवेश घेताय... तर हे नक्की वाचा
पुणे : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वेध लागतात ते चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे. पण जरा थांबा, यंदाची प्रवेश प्रक्रिया काहीशी ऐतिहासिकच असणार आहे. कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) प्रथमच चार वर्षाच्या पदवीसाठी तुम्ही पात्र ठरले आहेत.
जेथे ४० टक्के श्रेयांक हे रोजगाराभिमुख ऐच्छिक विषय निवडण्यासाठी निश्चित करायचे आहे. या पार्श्वभूमीवर पदवी प्रवेशासाठी नक्की काय काळजी घ्यावी, याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न...
नव्या बदलांना समजून घ्या...
- तीन वर्षां ऐवजी आता चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असेल
- मुख्य आणि अवांतर विषयांचे प्रमाण ६० ः ४० असे असणार आहे
- विद्यार्थ्याला अभ्यासक्रम निवडीच्या स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही वाढली
- ऐच्छिक आणि व्यवसायाभिमुख विषयांची निवड स्वतः करायची आहे
- कार्यानुभव किंवा संशोधनाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची निवड करा
- राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, कला मंडळांचे स्वतंत्र श्रेयांक मिळणार आहे
सध्याची स्थिती काय?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमांचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, अभ्यासमंडळांच्या नियुक्त्यांनंतर विषयांचा अभ्यासक्रम निश्चिती करण्यात येईल मात्र, स्वायत्त महाविद्यालयांनी त्यांचा अभ्यासक्रमांचा आराखडा निश्चित केला आहे. ज्याचा विद्यार्थ्यांना थेट फायदा होईल. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना मात्र अजून काही काळ थांबावे लागेल.
विद्यार्थ्यांनी काय करावे?
- आपल्याला करिअर नक्की कशात करायचे याचा आजच विचार करा
- ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. तेथील अभ्यासक्रमाचा आराखडा समजून घ्यावा
- आपल्या आवडीनुसार मुख्य आणि इतर विषय निश्चित करावे
- नव्या बदलांसंदर्भात सतर्क राहावे
- महाविद्यालयांची संकेतस्थळांना वेळोवेळी भेट द्यावी
- चार वर्षाच्या पदवीच्या दृष्टीने नव्या धोरणाचा अभ्यास करावा
नव्या आराख्याडीत श्रेयांक
- एक वर्षाचा प्रमाणपत्र ः ४४ मुख्य आणि ४ ऐच्छिक
- दोन वर्षाची पदविका ः ८८ मुख्य आणि ४ ऐच्छिक
- तीन वर्षाची पदवी ः दोन्ही मिळून १३२
- चार वर्षाची पदवी (ऑनर्स) ः १७६
पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी ‘मेजर’ विषय निश्चित करायला हवा. महाविद्यालयात असलेले रोजगाराभिमुख किंवा कौशल्याभिमूख अभ्यासक्रमांची चाचपणी करावी. तसेच तेथे चालणारे अवांतर कार्यक्रमांना समजून घ्यायला हवे. त्यासाठी नेहमी सतर्क राहायला हवे.
- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, टी.जे.कॉलेज, खडकी