राज्यात 5 मेपर्यंत "ग्रामस्वराज'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक - केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या धोरणानुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 5 मेपर्यंत ग्रामस्वराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धिंगत करणे, सद्य:स्थितीत कार्यरत योजनांची माहिती घेणे आणि नवीन उपक्रमांमध्ये समावेश करून घेणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, स्वच्छता अशा राष्ट्रीय कार्यक्रमांना पुढे नेण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

देशातील अधिक गरीब कुटुंब असलेल्या 21,058 गावांची निवड अभियानासाठी करण्यात आली आहे. त्यात राज्यातील 23 जिल्ह्यांतील 192 गावांचा समावेश आहे. "सबका साथ सबका गाव सबका विकास' या विशेष मोहिमेद्वारे पंतप्रधान उजाला, उज्ज्वला, प्रत्येक घरात सहज वीज (सौभाग्य), जनधन, जीवनज्योती विमा, सुरक्षा विमा, मिशन इंद्रधनुष्य अशा सात योजना सर्व गावांमध्ये राबवत शंभर टक्के साध्य पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनाच्या सामाजिक न्यायदिनापासून अभियानाची सुरवात झाली आहे. 18 एप्रिलला स्वच्छ भारत, 20 एप्रिलला उज्ज्वला, 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज, 28 एप्रिलला ग्रामस्वराज, 30 एप्रिलला आयुष्यमान भारत, 2 मेस शेतकरी कल्याण, 5 मेस आजीविका दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच 24 एप्रिलपर्यंत पोषण अभियान राबविण्यात येणार आहे.

विशेष ग्रामसभांचे आयोजन
स्वच्छ भारतदिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विविध कार्यक्रम राबवायचे आहेत. हगणदरीमुक्त ग्रामपंचायती करण्याचा प्रयत्न करणे सरकारला अपेक्षित आहे. ÷उज्ज्वला दिनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निश्‍चित केला जाणारा कार्यक्रम राबविला जाणार आहे. 24 एप्रिलला विशेष ग्रामसभा घ्यावयाच्या आहेत. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरून संपर्क अधिकारी आणि ग्रामपंचायतनिहाय ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. स्थानिक आर्थिक विकासासाठी ग्रामपंचायतीने विकास आराखडा तयार करावयाचा आहे. प्रभात फेरी, स्वच्छता अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा घ्यावयाच्या आहेत. ग्रामस्वराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करावयाचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सहअध्यक्ष असतील. ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव असतील.

Web Title: gramswaraj in state rural development department