मराठीच्या जयघोषात ग्रंथदिंडीला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

डोंबिवली - टाळ-मृदंग, ढोल-ताशांच्या निनादात आणि मराठी भाषेचा गजर करत डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरातून ग्रंथदिंडीला शुक्रवारी जल्लोषात प्रारंभ झाला. या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा- महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, काव्यरसिक मंडळ, साहित्यप्रेमी नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.

डोंबिवली - टाळ-मृदंग, ढोल-ताशांच्या निनादात आणि मराठी भाषेचा गजर करत डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरातून ग्रंथदिंडीला शुक्रवारी जल्लोषात प्रारंभ झाला. या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा- महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, काव्यरसिक मंडळ, साहित्यप्रेमी नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.

श्री गणेश मंदिरात माजी राज्यमंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते सरस्वतिपूजन झाले. यंदाच्या 90 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, महापौर राजेंद्र देवळेकर, मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी ग्रंथपूजन केले. त्यानंतर मराठी भाषेचा जयघोष करीत ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या अग्रस्थानी नऊवारी परिधान केलेल्या तीन महिला बुलेटवरून दिशादर्शन करीत होत्या. त्यांच्यामागे संत गाडगेबाबांच्या वेशात स्वच्छतेचा संदेश देत हातात झाडू घेऊन रस्ता साफ करणारे गृहस्थ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. संत तुकारामांच्या वेशात अभंग गायन करत मार्गक्रमण करत होते. त्यापाठोपाठ संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे, कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, इंद्रजित ओरके, सतीश देशपांडे, सच्चिदानंद शेवडे हे साहित्याचे उपासक सहभागी होते. या ग्रंथदिंडीमध्ये पूजन केलेल्या ग्रंथांची पालखी व त्यामागे दोन चित्ररथ, एकावर संत ज्ञानेश्वर महाराजांपासून चालत आलेला मराठीचा वारसा, मराठी साहित्याचा वारसा व दुसऱ्यावर "आम्ही डोंबिवलीकर' मासिकातर्फे काढलेल्या डोंबिवलीच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला साजेशा विशेषांकांची मांडणी करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग
या ग्रंथदिंडीत स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचे लेझीम पथक, वक्रतुंड ढोल पथक, संवाद कर्णबधिर शाळेचे विद्यार्थी, शांतिनगर प्रगती महाविद्यालय, मॉडेल महाविद्यालय अशा डोंबिवलीतील विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, तसेच काव्यरसिक मंडळ, साहित्य सभा, हास्यकट्टा, ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थांचे पदाधिकारी व साहित्यप्रेमी डोंबिवलीकर नागरिक मराठी भाषेचा वारसा पुढे नेण्यासाठी उत्साहाने सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: granth dindi in dombivli