जीएसटी पद्धत अन्यायकारक - सुप्रिया सुळे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

जेजुरी - जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पद्धतीने होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने जीएसटीतील व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या अन्यायकारक अटी दूर कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

जेजुरी - जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पद्धतीने होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने जीएसटीतील व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या अन्यायकारक अटी दूर कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

जेजुरी येथे व्यापाऱ्यांच्या अडीअडचणीबाबत चर्चा करताना सुळे बोलत होत्या. या वेळी व्यापाऱ्यांनी अडचणी मांडल्या. या वेळी माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे, राजेंद्र पेशवे, नगरसेवक अरुण बारभाई, जयदीप बारभाई, नगरसेविका मंगल दोडके, अमिना पानसरे, साधना लाखे, साधना दिडभाई उपस्थित होते. 

सुळे म्हणाल्या, ‘‘जेजुरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली जागा वापरण्यासाठी देता येईल का, याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहे. तेथे सध्या बाजार भरतो. बाजारातील व्यापारी व शेतकरी यांना तेथे सुविधा देता येतील.’’

जयदीप बारभाई, विठ्ठल सोनवणे, मेहबूब पानसरे, नारायण आगलावे, मोहन नाझिरकर यांनी या वेळी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. गाळेधारकांवर अन्याय होऊ नये, जेजुरी पालिकेच्या मोरगाव रस्त्यावरील असलेल्या गाळाधारकांना मुदत संपल्याने पालिकेने नव्याने लिलाव करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. 

बैठकीत या विषयावर लक्ष वेधण्यात आले. गेली अनेक वर्षे व्यवसाय करणारे व्यापारी व दुकानदार यानिमित्ताने अडचणीत येणार आहेत. त्यांच्यावर अन्याय आहे. व्यवहार आणि कायदा यांची सांगड घालून हा प्रश्न सोडविता येईल. त्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू, असे सुळे म्हणाल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष एन. डी. जगताप यांनी सूत्रसंचालन केले. राहुल घाडगे यांनी आभार मानले.

Web Title: GST unfair method says supriya sule