ब्रेकिंग ! 'हे' मंत्री म्हणाले...सोलापुरात पुन्हा कडक लॉकडाउन होणार नाहीच 

तात्या लांडगे
Monday, 20 July 2020

पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले... 

 • सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 31 गावांतील हा शेवटचा कडक लॉकडाउन 
 • सोशल डिस्टन्सिंग, मास्क अन्‌ स्वच्छता याचे तंतोतंत पालन केल्यास कोरोना होईल हद्दपार 
 • शहर-जिल्ह्यात एक लाखांहून अधिक रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे निर्देश 
 • सोलापुकरांनी स्वत:च्या कुटुंबाची सुरक्षितता जपावी; लॉकडाउन संपल्यानंतर नियमांचे पालन करणे आवश्‍यक 
 • कोरोनाबाधित रुग्ण औषधोपचारामुळे बरा होतोय, पण या विषाणूला हद्दपार करण्यासाठी जबाबदारी जनतेवरच 
 • नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास भविष्यात आरोग्य यंत्रणाही पडेल अपुरी

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने 23 मार्च ते 5 जूनपर्यंत कडक लॉकडाउन करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यात आला. मात्र, संसर्ग वाढू लागल्याने पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूरसह अन्य काही शहरांमध्ये पुन्हा कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कडक लॉकडाउन हा अंतिम पर्याय नसून आता नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करायला हवा. यापुढे कडक लॉकडाउन केला जाणार नाही, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात सर्वप्रथम 70 दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला. मात्र, या काळात हातावर पोट असलेल्यांसह लघू उद्योजकांचे मोठे हाल झाले. खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांनी कामगार कपात केल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बॅंकांच्या कर्जाचे हप्ते फेडणे मुश्‍किल झाले तर डोक्‍यावरील कर्ज वाढल्याने काहींनी आत्महत्याही केल्या. हाताला काम नसल्यांची उपासमार होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता यापुढे सोलापूर शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउनचा निर्णय होणार नसल्याचे पालकमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले. राज्याच्या मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य विभागाने कोरोनाला हरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करुन देण्यात आला. तसेच कोरोनाबाधितांवर मोफत उपचार व्हावेत या उद्देशाने सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेतून उपचाराची सोय करुन दिल्याचेही ते म्हणाले. रुग्णांचे वेळेत निदान होऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यासाठी आता रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केल्या जात आहेत. कुटुंबातील व्यक्‍तींनी त्यामध्ये स्वत:हून सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. दरम्यान, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाउन केला जाणार नसल्याचे आज स्पष्ट केले आहे. 

पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले... 

 • सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 31 गावांतील हा शेवटचा कडक लॉकडाउन 
 • सोशल डिस्टन्सिंग, मास्क अन्‌ स्वच्छता याचे तंतोतंत पालन केल्यास कोरोना होईल हद्दपार 
 • शहर-जिल्ह्यात एक लाखांहून अधिक रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे निर्देश 
 • सोलापुकरांनी स्वत:च्या कुटुंबाची सुरक्षितता जपावी; लॉकडाउन संपल्यानंतर नियमांचे पालन करणे आवश्‍यक 
 • कोरोनाबाधित रुग्ण औषधोपचारामुळे बरा होतोय, पण या विषाणूला हद्दपार करण्यासाठी जबाबदारी जनतेवरच 
 • नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास भविष्यात आरोग्य यंत्रणाही पडेल अपुरी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Dattatraya Bharane clarified There will be no more strict lockdown in solapur