पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिली ‘डीजेमुक्त सोलापूर’ची ग्वाही! सोलापुरातील डॉक्टर्स पोलिस आयुक्तांच्या भेटीला, आयुक्तांनी घेतली ‘डीजे’वाल्यांची बैठक, लेझर लाईटवर निर्बंध

सोलापुरातील उत्सव व मिरवणुकीत कर्णकर्कश आवजाचे डीजे वाजविल्याने शहरात काही लोकांचे मृत्यू डीजेच्या आवाजाने झाल्याचे आपण पाहिले आहे. सोलापुरात डीजे वाजवू नये अशी सर्वांचीच भूमिका आहे. पालकमंत्री म्हणून जी भूमिका जनतेची आहे, तीच माझीही भूमिका असणार आहे. येणाऱ्या काळात जनतेला ‘डीजे’चा हा त्रास होणार नाही याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे.
Jayakumar Gore
Jayakumar GoreSakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील उत्सव व मिरवणुकीत कर्णकर्कश आवजाचे डीजे वाजविल्याने शहरात काही लोकांचे मृत्यू डीजेच्या आवाजाने झाल्याचे आपण पाहिले आहे. ही वस्तुस्थितीही आहे. या मोठ्या आवाजाचा परिणाम अनेकांच्या श्रवण यंत्रणेवरही झाला आहे. समाजातील कॉमन मॅन, डॉक्टर, वकिलांसह या शहरातील सगळ्याच नागरिकांची आहे. सोलापुरात डीजे वाजवू नये अशी सर्वांचीच भूमिका आहे. पालकमंत्री म्हणून जी भूमिका जनतेची आहे, तीच माझीही भूमिका असणार आहे. येणाऱ्या काळात जनतेला ‘डीजे’चा हा त्रास होणार नाही याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनात पत्रकारांशी मंत्री गोरे यांनी संवाद साधला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते. ‘डीजेमुक्त सोलापूर’साठी दैनिक सकाळाच्या कार्यालयात कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर आज शहरातील डॉक्टरांनी कृती समितीच्या माध्यमातून संघटित होत पोलिस आयुक्तालयावर रॅली काढली. डीजेमुक्त सोलापूरसाठी समाजातील सर्व घटकातील पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे ‘डीजेमुक्त सोलापूर’बद्दल आता अधिक आशा निर्माण झाली आहे.

गोरे म्हणाले, सोलापूर शहर हे सामाजिक संस्कृतीचे शहर असून या ठिकाणी सर्व समाजाचे नागरिक मिरवणुकीच्या माध्यमातून उत्सव साजरे करतात. या मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे डीजे असतात. डीजेचा आवाज कमी करण्यासाठी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या होत्या. तरीही, आवाजाचे परिणाम होताना दिसत आहेत. जनतेची जी मागणी आहे, पालकमंत्री म्हणूनही माझी तीच भूमिका आहे. जनतेला लवकरच या त्रासातून मुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डीजेवाल्यांसाठी पोलिस आयुक्त देणार लिखित नियमावली

डीजेमुक्तीसाठी सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स व विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात डीजेवाल्यांची सोमवारी (ता. २५) बैठक पार पडली. त्यावेळी डीजे व्यावसायिकांना आवाजाची मर्यादा पाळावीच लागेल, त्यासाठी त्यांना लिखित नियमावली देण्याचा निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक मिरवणुकीत डीजे व्यावसायिकांना आवाजाची मर्यादा पालन करणे बंधनकारक आहे. पण, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या ऑर्डरनुसार आम्ही त्यांना सेवा देतो, असा मुद्दा डीजे व्यावसायिकांनी या बैठकीत मांडला. सोलापूर शहरात ‘एक बेस एक टॉप’ला परवानगी देण्यात आली आहे.

तरीपण, डीजे व्यावसायिक त्यांच्या मशिनमध्ये कृत्रिम बदल करून आवाज वाढविणारे मिक्सर लावतात. त्या मिक्सरवरच पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी बोट ठेवले. यापुढे त्या मशिनमध्ये कोणताही बदल खपवून घेतला जाणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. डीजे व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजासंदर्भातील नियमांचे पालन करताना कोणत्या बाबींचे काटेकोर पालन करावे, हे त्यांना पोलिस आयुक्तालयाकडून लेखी दिले जाणार आहे. त्यानंतरही कोणी आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीसाठी सोलापूरसह बाहेरील जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त डीजे व्यावसायिक उपस्थित होते.

लेझर बीम लाईटवर पोलिसांचे निर्बंध

सोलापूर शहरात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात गणेशोत्सव साजरा होणार आहे. ७ सप्टेंबरला ईद-ए- मिलाद (महम्मद पैगंबर जयंती) साजरी होणार आहे. यावेळी कोणीही प्रखर बीम लाईट, प्लाझ्मा व लेझर बीम लाइट वापरू नये, असे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ प्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोलापूर शहरात तीन, पाच, सात व नऊ दिवस आणि अनंत चतुर्दशी दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होते. मिरवणुकांमध्ये बहुतेकजण साऊंड सिस्टिमसोबत बीम लाईट, प्लाझ्मा लाईट लावतात. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांसह वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुर्घटना घडू शकतात. मिरवणुका पाहायला आलेले वृद्ध, महिला, लहान मुलांच्या डोळ्यास इजा होऊ शकते. डोळे निकामी होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे कोणीही त्या लाईटचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील, कोणी तशी लाइट वापरली तर त्या आयोजकांवर कारवाई केली जाईल, असेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com