गुढीपाडवा यंदा 28 मार्च रोजीच - मोहन दाते 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

सोलापूर - ""गुढीपाडव्या दिवशी मंगळवारी (ता. 28) सूर्योदयानंतरही काही वेळ अमावस्या आहे; परंतु प्रतिपदेचा क्षय असल्याने त्याचदिवशी गुढीपूजनासह गुढीपाडवा करावा, तसेच आठ वाजून 27 मिनिटांनंतर नेहमीप्रमाणे गुढीची पूजा, पंचांगपूजा व गुढीपाडवा करावा,'' असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सोलापूर - ""गुढीपाडव्या दिवशी मंगळवारी (ता. 28) सूर्योदयानंतरही काही वेळ अमावस्या आहे; परंतु प्रतिपदेचा क्षय असल्याने त्याचदिवशी गुढीपूजनासह गुढीपाडवा करावा, तसेच आठ वाजून 27 मिनिटांनंतर नेहमीप्रमाणे गुढीची पूजा, पंचांगपूजा व गुढीपाडवा करावा,'' असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी "सकाळ'ला सांगितले. 

गुढीपाडवा यंदा मंगळवारी (ता. 28) आहे. याबाबत काहींनी वेगळी मते मांडल्याने संभ्रम निर्माण झाला. पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले, ""मंगळवारी सूर्योदयानंतरही अमावस्या सकाळी आठ वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. म्हणून तो दिवस अमावस्येचा असे काही जण म्हणतात; मात्र प्रतिपदाही त्याचदिवशी उत्तररात्री म्हणजे उजाडत्या बुधवारी पहाटे पाच वाजून 45 मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे मंगळवार व बुधवारच्या सूर्योदयाला प्रतिपदा नसल्याने तिचा क्षय आहे. अशावेळी अमावस्या संपल्यानंतरचा दिवस प्रतिपदा गृहीत धरावा, असे शास्त्र आहे.'' 

गणित पद्धतीच्या भिन्नतेमुळे दोन दिवस पाडवा 
भारतात साधारणतः सूर्यसिद्धांतीय व दृक्‍प्रत्ययी गणित पद्धतीद्वारे पंचांग तयार केले जाते. गावोगावच्या सूर्योदयातील वेगवेगळ्या वेळेमुळे पंचांगात काही वेळा तिथीबाबत फरक दिसतो. यंदाही याच कारणाने पाडव्याबाबत संभ्रम आहे; मात्र आपण नेहमी जे पंचांग वापरतो, त्यानुसार पाडवा करावा. दाते पंचांग दृक्‍प्रत्ययी गणित पद्धतीचे असल्याने त्यानुसार 28 मार्चला पाडवा करणे सोयीचे आहे. महाराष्ट्र, गुजरातसह भारतातील सर्व दृक्‍प्रत्ययी पंचांगामध्ये व भारत सरकारच्या राष्ट्रीय पंचांगामध्येही गुढीपाडवा 28 मार्चला आहे. उत्तरेकडील काशी वगैरे भागात सूर्यसिद्धांतीय गणित पद्धतीतील पंचांग वापरत असल्याने त्यामध्ये 29 मार्चला पाडवा दिलेला आहे. त्यामुळे गणित पद्धतीतील भिन्नतेमुळे हा फरक आहे. 

यापूर्वीही दोन दिवस पाडवा 
यापूर्वी 6 एप्रिल 2008 रोजी पूर्वेकडील व पश्‍चिमेकडील प्रदेशात क्षय तिथीच्या संदर्भात 6 व 7 एप्रिल असा दोन दिवस गुढीपाडवा होता. त्या वेळी सूर्योदयाची वेळ गावोगावची वेगळी असल्याने असे झाले होते. यंदा मात्र पंचांगातील गणित पद्धतीमुळे दोन दिवस गुढीपाडवा दिसतो आहे. 

Web Title: Gudhipadva On 28 March