पुण्यातील गुंजवणी धरणास होणार लाभ, जल आराखडा दुरुस्तीस मान्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

राज्य जल परिषदेची सातवी बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असता एकात्मिक राज्य जल आराखडा दुरुस्तीस मान्यता देण्यात आली. यामुळे पुणे जिल्हयातील गुंजवणी धरणासाठी लाभ होणार आहे.

मुंबई - राज्य जल परिषदेची सातवी बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असता एकात्मिक राज्य जल आराखडा दुरुस्तीस मान्यता देण्यात आली. यामुळे पुणे जिल्हयातील गुंजवणी धरणासाठी लाभ होणार आहे.

एकात्मिक राज्य जल आराखड्यात व एकात्मिक कृष्णा खोरे जल आराखड्यात गुंजवणी प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्राची आकडेवारी द्वितीय सुप्रमानुसार सुधारित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुंजवणी प्रकल्पाच्या इतर तपशिलामध्ये कोणताही बदल न करता सुधारित सिंचन क्षेत्र 21392 हेक्‍टर व पीक क्षेत्र 27637 हेक्‍टर अशी दुरुस्ती करण्यात आली. यामुळे प्रत्यक्ष सिंचनात वाढ होणार आहे.

कृष्णा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. आवश्‍यकता भासल्यास पाणी उपलब्धतेच्या परवानगीसाठी लवादाकडे संदर्भ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले.

यावेळी मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधितांना महत्वपूर्ण सूचना केल्या. या बैठकीस कृती गट अध्यक्ष तथा मेरीचे महासंचालक एच.के. गोसावी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सं.दे. कुलकर्णी, मुख्य अधिक्षक रा.ह. मोहिते, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ.प्र.कोहीटकर तसेच नागपूरचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंधारण मंत्री डॉ.तानाजी सावंत, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे सचिव (ला.क्षे.वि.) रा.रा. पवार, सचिव (प्रकल्प समन्वय) संजय घाणेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gunjawani Dam Approval of water draft repairs