कोकणचा राजा परदेशी झिम्मा खेळतो...

कोकणचा राजा परदेशी झिम्मा खेळतो...

"मॅंगोनेट' प्रणालीमुळे हापूसचे उड्डाण सोपे!
मुंबई - कृषी पणन मंडळातर्फे सादर केलेल्या मॅंगोनेट प्रणालीमुळे बागायतीतून आंबा थेट परदेशांत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रशियात 800 रुपये प्रतिडझन दर मिळाला. नेदरलॅण्डमधूनही मागणी आली; परंतु रत्नागिरीतील "पणन'च्या प्रक्रिया हाउसला अद्याप सर्टिफिकेट मिळालेले नसल्याने आंबा थेट युरोपमध्ये पाठविण्यात अडचणी आहेत. मात्र, वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमधून युरोप, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, दुबई आणि रशिया या देशांमध्ये हापूसने बस्तान बसवले आहे. वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या एकूण मालापैकी 40 टक्‍के हापूस आखाती देशांमध्ये जातो. त्याबरोबरच इंग्लंड, युरोप, हॉंगकॉंग, सिंगापूर, कॅनडा या देशांनाही आंब्याची निर्यात होते.

एप्रिल ते मे हा हापूस आंब्याचा मुख्य हंगाम मानला जातो. हंगामात वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूसची आवक मोठ्या प्रमाणात होते. यापैकी साठ टक्के आंबा परदेशांत निर्यात होतो. यंदा मोठी आवक झाल्याने निर्यातीला वेग आला आहे. अर्थात, त्यासाठी निर्यातदारांना अनेक अडथळे ओलांडावे लागत आहेत. आंब्याची निर्यात हवाई किंवा समुद्रमार्गे होते. हवाई मार्गाने आखाती देशांत आंबा अवघ्या तीन तासांत पोचतो. लंडन- युरोपमध्ये आंबा पाठवण्यासाठी चौदा ते पंधरा तास लागतात. त्यामुळे खर्च वाढत असला तरी हवाई मार्गाने आंबा पाठवणे निर्यातदारांना सोयीस्कर वाटते; त्यातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निर्यातदार सांगतात. हंगामात आंब्याची आवक आणि निर्यातही वाढते, त्यामुळे विमान कंपन्याही भाडे वाढवतात. त्याचा फटका निर्यातदारांना बसतो. आंब्याची किंमतही पुरवठ्यावरच ठरते. जितका जास्त आंबा बाजारात तेवढी त्याची किंमत कमी. शिवाय, निर्यात होणाऱ्या आंब्यासाठी ठरलेली विक्री किंमत असते, त्यामुळे व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. दर वर्षी आंबा निर्यातीतून देशाला सरासरी चारशे ते पाचशे कोटींचे परकी चलन मिळते. म्हणून सरकारने आंबा निर्यातीसाठी सवलती देण्याची मागणी निर्यातदारांकडून होत आहे.

मॅंगोनेटचा उपयोग
"मॅंगोनेट' ही प्रणाली पणन मंडळाने गेल्या वर्षी सादर केली. आपल्या मालकीच्या जमिनीत आंब्याच्या बागा असल्याचे सिद्ध करणाऱ्या बागायतदारांना पणन मंडळातर्फे खास परवाना मिळतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून पंधरा दिवसांमध्ये दोन हजार 700 किलो आंबा परदेशी पाठवला गेला.

निर्यातदाराने थेट बागायतदारांशी संपर्क साधून आंबा पाठविल्याने बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निर्यातीसाठी उपयुक्त पणन मंडळाच्या प्रक्रिया केंद्रामुळे बागायतदारांच्या अडचणीही कमी झाल्या आहेत. काही देशांत निर्यात होणाऱ्या आंब्यांवर "हॉट वॉटर ट्रीटमेंट' आवश्‍यक असते, तर काही देशांत "व्हेपर ट्रीटमेंट'ने पिकवलेलाच आंबा लागतो; मात्र या साऱ्यासाठी पणन मंडळाची मदत होत असल्याने आंबा बागायतदार सुखावले आहेत.

अर्थात, कोकणच्या राजाच्या वाटेतल्या अडचणी संपलेल्या नाहीत. वातावरणातील बदलामुळे फळांचा राजा संकटात आला. कोठे तो करपला, कोठे फलधारणा व्हायच्या वेळी उन्हाच्या तापामुळे मोठ्या प्रमाणावर गळ झाली. काही ठिकाणी तर आंबा भाजला. या स्थितीतही चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यातील काही बागांमध्ये हवामानाच्या बदलांना तोंड देत हापूस झाडाला लगडलेला दिसतो. भिले, करंबवणे, केतकी, मालदोली येथील बागांमध्ये उष्म्यामुळे आंब्याची गळ, आंब्यावर डाग पडणे किंवा डागाळल्याने आंबे खराब होणे अपवादात्मक आहे. आंब्याने वातावरणाचा ताप पचवलेला दिसतो. बागेत चर, खड्डे मारून पालापाचोळा, कचरा व शेण यामुळे कंपोस्ट तयार होते. पावसाचे पाणी वेगाने वाहून जात नाही आणि धूपही घटते. त्यामुळे भुसभुशीत जमिनीतून पांढरी मुळे अधिक अन्न शोषण करतात. ऍड. संजय केतकर यांच्या आंब्याच्या बागा आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बागेत यज्ञात वापरावयाच्या समीधा आणि गाईचे तूप यांचा धूर करतात. आठवड्यातून तीनदा सूर्योदयावेळी तासभर धूर करून हवा शुद्ध होते, त्यामुळे बागेत पक्षी येण्याचे प्रमाण वाढले. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला.

खाडीपट्ट्यात आंबा चांगला होतो; परंतु या वर्षी सर्वत्र ताप झाला आहे. माझ्या बागांमध्ये वातावरणाच्या बदलाने फारसा परिणाम केला नाही. बागेबाहेर पाच फुटांवर उष्ण वातावरण असताना बागेमध्ये थंडावा असतो. हे कोणत्या कारणाने झाले ते सांगणे कठीण आहे; पण वास्तव हे आहे, की माझ्या बागा आंब्याने बहरलेल्या आहेत.
- ऍड. संजय केतकर, बागायतदार

भारतातून आंब्याची निर्यात
2015-16 (किंमत लाख रुपयांत, निर्यात मेट्रिक टनमध्ये)
देश निर्यात किंमत

संयुक्त अरब अमिराती 19,973.60 19,199.34
ब्रिटन 1496.28 3205.72
सौदी अरेबिया 1399.08 1,675.19
नेपाळ 8273.99 1,393.53
कुवेत 748.25 1,298.33
कतार 1,016.25 1,023.29
अमेरिका 266.45 734.30
बहारिन 747.79 633.01
सिंगापूर 579.96 626.27
ओमान 426.84 412.50
एकूण 34,928.59 30,201.48

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com