उत्पादन घटूनही हापूसला भाव नाही 

उत्पादन घटूनही हापूसला भाव नाही 

मुंबई - हवामान बदलाचा फटका बसल्याने कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन कमी होऊनही मे महिन्यात भाव कोसळल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने त्यांना अर्थसाह्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे. 

हवामान बदलामुळे या वर्षी कोकणातील हापूसचे 30 ते 32 टक्केच उत्पादन झाले. तरीही मे महिन्यात त्याचे भाव कोसळल्याने उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे. मोकल म्हणाले, की कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील हापूस बाजारात आल्याचाही फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे. कर्नाटक हापूस किलोवर विकला जातो. त्यामुळे तो स्वस्त आहे. त्या तुलनेत कोकणचा हापूस पेटी किंवा डझनावर विकला जात असल्याने महाग आहे. त्यामुळे अनेक विक्रेते कर्नाटक-आंध्र प्रदेशच्या हापूसला पसंती देतात. 

सरकारने भाजीपाला व फळे नियमनमुक्त केली असल्याने शेतकरी माल हवा तेथे विकू शकतात. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या आवश्‍यक पायाभूत सुविधा सरकारने निर्माण केल्या नाहीत. मंडया, किरकोळ विक्री केंद्रे, व्यापारी केंद्रे व देशांतर्गत विक्री व्यवस्था करण्याबाबत सरकारचे धोरण उदासीन आहे. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना आंबे विक्रीसाठी बाजार समित्यांमधील दलालांवर अवलंबून राहावे लागते. आडत रद्द झाल्याने हे दलाल शेतकऱ्यांचा माल विकण्यात स्वारस्य दाखवत नाहीत. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन ते हवे तसे भाव पाडतात. त्यामुळे शेतकऱ्याला आजही त्याच्या मालाचा दर त्याच दिवशी कळत नाही; तसेच तो ठरवताही येत नाही, असे मोकल यांनी सांगितले. 

आंबा कोणत्या ठिकाणचा, हे नमूद हवे! 
कीटकनाशके व खतांचा खर्च वाढल्याने आंबा बागायतदार दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यातच दुय्यम दर्जाच्या कर्नाटक हापूसचे आक्रमण होत आहे. ते रोखण्यासाठी आंबा कोणत्या ठिकाणचा आहे, ते पेटीवर ठळकपणे लिहिणे बंधनकारक करावे, असे आवाहनही आंबा उत्पादक संघाने सरकारकडे केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com