महापालिका निवडणुकीत पोलिस दादा अन्‌ ताईंची कठोर मेहनत! पोलिस आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांच्या मतदान केंद्रांना भेटी; १०० मीटरची मर्यादा, केंद्रांवर मोबाईलबंदी, शांततेत मतदान

महापालिका निवडणुकीसाठी शहरात १०९१ मतदान केंद्रे होती. त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदोबस्तावरील पोलिसांनी मतदारांना मतदान करायला जाताना मोबाईल घेऊन जाऊ दिला नाही. १०० मीटर अंतरावरील बंदोबस्तही चोख होता. त्यामुळे महापालिकेसाठी शांततेत मतदान पार पडल्याचे पाहायला मिळाले.
solapur city police

solapur city police

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी शहरात १०९१ मतदान केंद्रे होती. त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदोबस्तावरील पोलिसांनी मतदारांना मतदान करायला जाताना मोबाईल घेऊन जाऊ दिला नाही. १०० मीटर अंतरावरील बंदोबस्तही चोख होता. त्यामुळे महापालिकेसाठी शांततेत मतदान पार पडल्याचे पाहायला मिळाले.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा बंदोबस्त करून महापालिका निवडणुकीत सोलापूर शहरातील व बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या एकूण ३१०० अंमलदार, होमगार्ड व अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताची ड्यूटी बजावली. आता त्यांना मतमोजणीचाही बंदोबस्त असणार आहे. मतदानादिवशी पोलिसांच्या मदतीसाठी एक हजार होमगार्ड होते. मतदान केंद्राच्या सुरवातीला थांबलेले होमगार्ड व अंमलदार हे मतदारांना त्यांच्या बूथची माहिती देत होते. संवेदनशील ४६ मतदान केंद्रांवर देखील कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्यासह पोलिस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, गौहर हसन, सर्व सहायक पोलिस आयुक्त, सातही पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी मैदानात उतरले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गाडीतील माईकवरून सर्व मतदार व मतदान केंद्रांजवळ थांबलेल्यांना कारवाईचा इशारा देत हाकलून देत होते. प्रत्येक अंमलदार आपल्या मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेत होता. मोबाईल घेऊन जाऊन कोणीही व्हिडिओ किंवा फोटो काढू नये म्हणून प्रत्येकाचा मोबाईल बाहेर काढून ठेवायला सांगितले जात होते. राज्य निवडणूक आयोगाची पथके, महापालिकेची यंत्रणा अनेक ठिकाणी दिसलीच नाही.

जेवण चांगले होते, पण केंद्रांवर सुविधा नव्हत्या

मतदान केंद्रांवरील पोलिस अंमलदार, अधिकाऱ्यांसाठी पॅकबंद जेवण आले होते. जेवणाचा दर्जा उत्तम होता, पण शौचालय, स्वच्छतागृहे व पाण्याची व्यवस्था अनेक केंद्रांवर नसल्याची खंत पोलिस अंमलदारांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. काही केंद्रांना वॉल कंपाउंड नव्हते, पण १०० मीटरची रेघ मारून त्याच्या आत कोणीही येणार नाही, याची खबरदारी पोलिस अंमलदारांनी घेतली होती. बऱ्याच केंद्रांवर फिरती शौचालये, स्वच्छतागृहे दिली होती, पण ती बिनकामाचीच होती.

तीन ठिकाणी तक्रारी...

  • मतदान प्रतिनिधी रोहित श्‍यामराव लालसरे हा मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन येण्यावर निर्बंध असताना देखील कुमठे केंद्रावर दोन मोबाईल घेऊन आला होता. मोबाईल बाहेर ठेवा म्हणून सांगितल्यावर त्याने पोलिस अंमलदारांसमवेत हुज्जत घातली. या प्रकरणी लालसरेविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

  • जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किडवाई चौकात काँग्रेस व एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. शाब्दिक चकमक सुरू असतानाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत अंमलदारांसह तेथे दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून सर्वांना पांगवले.

  • एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विडी घरकुलमध्ये एका मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवाराने केंद्रातील व्हिडिओ काढून सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने प्रसारित केला. मतदान केंद्राध्यक्षासमवेत हुज्जत घातली. या प्रकरणी केंद्राध्यक्षाची फिर्याद आल्यावर त्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com