esakal | गुरजी, ‘साळा’ म्हंजी काय हो? राज्यातील आठ हजार मुलांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Education

गुरजी, ‘साळा’ म्हंजी काय हो? राज्यातील आठ हजार मुलांचा सवाल

sakal_logo
By
- गजेंद्र बडे

पुणे - गुरुजी, मलाबी शिकायचं हाय. साळेतबी जायचं हाय. पण आमाली कुणी साळेत घातलंच नाय, असं गुरुजींना सांगत, साळा म्हंजी काय हाय, असा सवाल शाळेच्या उंबरठ्यापासून कोसो दूर असलेल्या राज्यातील सुमारे आठ हजार मुलांनी गुरुजींना केला आहे. राज्यात आजघडीला २५ हजार २०४ मुले शाळाबाह्य आहेत.

राज्य सरकारने शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांनी केलेले हे सवाल आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष आलेले हे अनुभव असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

शालाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत ही शालाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबविण्यात आली. यामध्ये औरंगाबाद, अमरावती व बुलडाणा या तीन जिल्ह्यात आणि जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड व नागपूर पालिका क्षेत्रातील काही भागात कोरोना संसर्गामुळे ही मोहीम राबवता आली नसल्याचे राज्याचे शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्यासाठी मंगळवारी 8 हजार रेमडेसिव्हीर; ICU बेड्सच्या संख्येत वाढ

दरम्यान, या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे शिक्षण संचालक कार्यालयाने राज्यातील सर्व शालाबाह्य विद्यार्थ्यांचा अहवाल तयार केला आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) दत्तात्रेय जगताप यांनी हा अहवाल २३ एप्रिल २०२१ ला राज्य सरकारला पाठविला आहे. यामध्ये याबाबतचा संबंधित कुटुंबांची सर्वसाधारण माहिती, शाळाबाह्य बालकांच्या वयोगट आणि त्यापैकी विशेष गरजाधिष्ठित मुले, स्थलांतरित होऊन गेलेली आणि स्थलांतरित होऊन जिल्हा-जिल्ह्यात आलेली मुले आदींची जिल्हानिहाय आकडेवारी देण्यात आली आहे.

राज्यात मुलांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायदा २००९ हा ता. १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.

यामुळे शाळेत कधीही दाखल न झालेली, शाळेत न जाणारी मुले, प्रवेश घेऊनही प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेली ६ ते १४ वयोगटातील मुले ही शालाबाह्य समजली जातात.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना तातडीने फायर ऑडिटचे आदेश

अशी आहे स्थिती

३ ते १८ वयोगटातील एकूण मुले - १,७१,०६,२३४

अंगणवाडीत दाखल - १,६८,८४,३१५

विशेष गरजाधिष्ठित (दिव्यांग) - १,३१,९८६

अंगणवाडीत दाखल झालेली विशेष गरजाधिष्ठित मुले - १,२६,५६३

शाळेत प्रवेश न घेतलेली ६ ते १४ वयोगटातील मुले - ७,८०६

अनियमित उपस्थितीमुळे शालाबाह्य मुले - १७,३९७

एकूण शालाबाह्य मुले - २५,२०४

बाल कामगार असलेली शालाबाह्य मुले - २८८

अन्य कारणांनी शालाबाह्य मुले - २३,७०४

loading image