Rajesh Tope | "मी इंदुरीकरांना फोन केला", टोपेंनी शेअर केला लसीकरणाचा किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"मी इंदुरीकरांना फोन केला", टोपेंनी शेअर केला लसीकरणाचा किस्सा

"मी इंदुरीकरांना फोन केला", टोपेंनी शेअर केला लसीकरणाचा किस्सा

राज्यभरात लसीकरणाच्या मोहिमेचा वेग वाढवून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक व्यक्तीला किमान एक डोस मिळावा, अशी भूमिका असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. यासाठी कवच कुंडल मोहिमेअंतर्गत घरोघरी लसीकरण करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान त्यांनी इंदुरीकर महाराजांना फोन केल्याचं सांगितलं.

काही दिवसांपूर्वी किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी लस घेण्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर सर्वांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. 'मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही,' असं वक्तव्य इंदुरीकरांनी नाशिक जिल्ह्यात बोलताना केलं होतं. त्यावर राज्यभर पडसाद उमटले. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही दखल घेऊन 'इंदुरीकरांचे प्रबोधन करू,' अशी प्रतिक्रिया दिली होती. अखेर टोपेंनी इंदुरीकरांना फोन केल्याची माहिती दिली.

इंदुरीकर महाराजांना फोन करून विज्ञानाधिष्ठित कार्यात सहभागी होण्याचं मी सांगितलं. त्यांनीही याला होकार दर्शवला आहे, असे टोपे म्हणाले. निवृत्ती महाराजांसोबत माझे घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी मी सांगितलेलं मान्य केलं, असं टोपेंनी सांगितलं.

दरम्यान, कॉन्ट्रोव्हर्सी झाल्यानंतर स्वत: इंदुरीकरांनीची नगर तालुक्यातील एका कीर्तनातून भाष्य केलं. 'मी लस घेतली नाही, घेणार नाही, असं म्हणालो. परंतु इतरांनी लस घेऊ नये, असं मी कुठेही म्हटलेलं नाही,' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, सोशल मीडियातून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. ते म्हणाले, 'दोन तासांच्या कीर्तनात एखादा शब्द चुकून जातो. तोच धागा पकडून स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी मला लक्ष्य करतात,' अशी खंत इंदुरीकरांनी बोलून दाखवली.

loading image
go to top