राज्यात वादळी पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

मराठवाडा पाऊस
नांदेड -
 जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी. शहरात रविवारी दुपारी आभाळाची दाट छाया. विजांच्या कडकडाटासह जिल्हाभरात पावसाच्या जोरदार सरी. कोकलगाव (ता. देगलूर) येथे वीज पडून चार जनावरे दगावली.

हिंगोली - जिल्ह्यात शनिवारी सिरसम बुद्रुक, बाळापूर, शेवाळा (ता. कळमनुरी), औंढा नागनाथ, गिरगाव, करंजाळा (ता. वसमत) येथे मेघगर्जनेसह पाऊस. 

औरंगाबाद - बीड, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस. उस्मानाबादमध्ये झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान.

हवामान तज्ज्ञांचा इशारा; पुणे, नाशिक, मराठवाड्यात पर्जन्यवृष्टी
मुंबई - ७ ते १२ ऑक्‍टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. दरम्यान, पुण्यातील काही भाग, नाशिक, मराठवाडा, सोलापूर भागात पावसाने शनिवार-रविवारी जोरदार हजेरी लावली.

नाशिकसह खानदेश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखेपर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११तारखेपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसह पाऊस पडेल. 

शहरात खेळ ऊन-पावसाचा! 
पुणे - शहरात आज ऊन-पावसाचा खेळ रंगला. एकामागून एक पडलेल्या जोरदार सरींमुळे कोथरूड, स्वारगेट, शिवाजीनगर, औंध भागातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहिले. परंतु, याच वेळी सिंहगड रस्त्यावरील धायरी, नांदेड आणि कात्रज परिसरातील काही भागांत कडक ऊन जाणवत होते.

वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू
जालना - शेतात काम करत असताना वीज पडून तीन  मजुरांचा रविवारी दुपारी बारा वाजता मृत्यू झाला आहे. जालना तालुक्यातील शेलगाव शिवारात ही घटना घडली. गयाबाई गजानन नाईकनवरे (वय ३५  रा.भागडे सावरगाव), संदिप शंकर पवार व मंदाबाई नागोराव चाफळे (दोघेही रा.सेवली) अशी मृत शेतमुजरांची नावे आहेत. तिन्ही मजुर सोयाबीन पिकांची काढण्यासाठी गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतात गेले होते. दुपारी आकाशात ढगांचा गडगडात होऊन विज कोसळली. ही वीज या शेतमजुरांच्या अंगावर कोसळल्याने तीघांचा जागीच मृत्यू झाला. 

सोलापूर शहर परिसरात पाऊस
सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात आज दुपारच्या सुमारास दमदार पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहर व परिसरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ऑक्‍टोबर हिटपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली. परतीच्या पावसाने सोलापूर शहर व जिल्ह्याला दिलासा मिळत आहे. ऑक्‍टोबरच्या सुरवातीपासूनच सोलापूर शहर व परिसरात प्रचंड उकाडा व उन्हाचा चटका जाणवण्यास सुरवात झाली आहे. आजच्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. आज सुटीचा दिवस आणि दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain maharashtra