भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 4 ऑगस्ट 2019

गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

नागपूर : गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, वाहतूक ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावाला पाण्याने वेढल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. 

भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस आहे. शुक्रवारी (ता. 2) रात्री जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्‍यात झाला. यामुळे लाखांदूर, नागपूर, सावरला व कन्हाळगावकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. आसगाव येथील 77, ढोरप येथील 15 व वाही येथील 20 घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे येथील 125 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पवनी-कोरंभी मार्गावरील विठोबा वैद्य यांच्या पोल्टीफार्ममध्ये पाणी शिरल्याने 412 कोबड्यांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा वाढल्याने 33 दरवाजे उघडून 5,868 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा दुथडी वाहत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने नदी, नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अंतर्गत मार्ग पावसामुळे बंद झाले आहेत.

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील उचली येथील भोजराज रामदास डोंगे (वय 55) नाल्यात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातही नदी-नाल्यांना पूर आला आहे. पैनगंगेच्या काठावरील 47 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Bhandara Chandrapur and Yavatmal