esakal | कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस - IMD
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस - IMD

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यभरात मॉन्सूनचा पाऊस चांगलाच सक्रीय झाला असून, पुढील दोन दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. सोमवारी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक अतिवृष्टी झाली. तसेच रायगड, मुंबई, ठाण्यासह पुणे, सातारा आणि कोल्हापूरला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Heavy rains in Konkan western Maharashtra for next two days IMD aau85)

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह कोकणात पावसाचा जोर कायम असून, पश्चिम महाराष्ट्रातही बहुतेक ठिकाणी पाऊस पडला. गेल्या चोवीस तासांत ठाणे शहरात १६१.८२ मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्गातही पावसाचा जोर कायम आहे. गेले आठ दिवस रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत रत्नागिरी तालुक्यात १२७.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. गावागावातील छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला आहे.

हेही वाचा: कांदिवलीत पावसाचा धुमाकूळ, एकाच चाळीत 9 झोपड्या जमीनदोस्त

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाण्यात मुसळधार पाऊस झाला. नाशिक शहरात दिवसभर रिमझिम सुरू होता, तर पूर्व पट्ट्याकडे मात्र पावसाने पाठच फिरविली आहे. दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी (दि. १८) रात्री मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. महाकाय दगडी व मातीचा मलबा रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

हेही वाचा: ठाणे - दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभर रिमझीम

शहर आणि उपनगरात सकाळपासून आकाश ढगाळ होते. बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारपर्यंत (दि. २३) तरी शहरात आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

loading image