मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर - दीर्घ कालावधीच्या खंडांनंतर मराठवाडा, विदर्भासह कोकण व इतर ठिकाणी पावसाने दणक्यात पुनरागमन केले आहे. शुक्रवार व शनिवारी अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली..मुंबईलाही जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे समाधानाचे वातावरण असले तरी काही ठिकाणी अतिवृष्टीने पिकांची हानी झाल्याने चिंताही वाढली आहे. सोयाबीन, कपाशी,मूग आदी पिकांना पावसाचा फटका बसला आहे.मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यांत गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सोयाबीन, कपाशी, काढणीला आलेले मूग, उडीद या पिकांना बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे..धाराशिव जिल्ह्यातील कळंब व वाशी तालुक्यांत गुरुवारी झालेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे. तेरणा नदीला पूर आला असून, माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा धरण भरले. शनिवारी सकाळी धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला. धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणही दोन दिवसांत काठोकाठ भरत आले आहे.परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मुंबर, गोळेगाव, धानोरा काळे, बाणेगाव, माहेर, फुलकळस आदी गावांत पावसाने खरीप पिके, हळद, उसाचे मोठे नुकसान झाले झाले. मुसळधार पावसाने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात वाहून गेले आहे. मांजरा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या दुतर्फा एक किलोमीटर अंतरातील पिके पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे..परभणी जिल्ह्यातील पाच व हिंगोली जिल्ह्यांतील एका मंडलात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे नदीनाले, ओढ्याचे पाणी पिकांमध्ये शिरले. जमिनी खरडून गेल्यामुळे हळद, ऊस, सोयाबीन, कपाशी, तूर आदींसह भाजीपाल्याचे नुकसान झाले.तर हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १० मंडलांत मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्प तुडुंब भरला आहे..शेतशिवारात पाणी साचलेनांदेड जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील २७ मंडलांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले आहे. लातूर जिल्ह्यातील खोंदला (ता. कळंब) येथील शेतकरी सुब्राव शंकर लांडगे (वय ६५) हे पुरात वाहून गेले असून, आपत्ती दलाच्या पथकाला त्यांचा अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. पावसामुळे धाराशिव, कळंब व वाशी तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले..कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊससातारा - कोयना धरणाच्या क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे, धरण क्षेत्रातील कोयना १०४, नवजा १७४, महाबळेश्वर ११७ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात १९,००८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.धरणात शनिवारी सकाळी आठपर्यंत ८९.९३ टीएमसी (८५.४४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. शनिवारी कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून २१०० क्युसेक विसर्ग कोयना नदीत सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा इशारापुणे - बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. रविवारी (ता. १७) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. .खानदेशात मोठ्या खंडानंतर पावसाची हजेरीजळगाव - खानदेशात सुमारे २२ ते २५ दिवसांनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. काही भागांत जोरदार पाऊस झाला. माती वाहून जाणे, शेत खरडणे असे प्रकारही नदीकाठी, नद्यांच्या लगत झाले आहेत. पण पावसाने काहीसा दिलासाही मिळाला आहे. खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगावात सर्वत्र कमी व बऱ्यापैकी स्वरुपातील पाऊस झाला आहे. जळगाव, धरणगाव भागात लहान नाले प्रथमच खळखळून वाहू लागले आहेत..विदर्भात पावसामुळे हाहाकारनागपूर - विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाने सोयाबीन, कपाशीसह संत्रा बागांना देखील मोठा फटका बसला आहे. चांदूर बाजार तालुक्यात शुक्रवारी (ता.१५) पावसाने एकच हाहाकार उडाला. शनिवारी (ता.१६) उमरखेड, महागाव, पुसद (यवतमाळ) भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या विडूळ भागात पाऊस बरसला. गेल्या २५ वर्षांत असा पाऊस बरसला नाही, अशी प्रतिक्रिया महेश्वर बिचेवार यांनी दिली. अनेक भागातील नद्या, नाल्यांची पातळी अचानक वाढल्याने त्यांना पूर आला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरल्याची माहिती सूत्रांनी दिली..विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यूमुंबई - जोरदार पावसामुळे विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षानगर भागात दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्री घडली. वर्षानगरमधील डोंगराळ झोपडपट्टीत असलेल्या जनकल्याण सोसायटीवर दरड कोसळली आणि तिचा ढिगारा एका घरावर जाऊन पडला. या दुर्घटनेत शालू मिश्रा (वय १९) आणि सुरेश मिश्रा (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.