महामार्ग झाले मृत्यूचे सापळे, शेकडो अपघात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

तीर्थक्षेत्र, कृषी पंढरी, वाइन कॅपिटल अशी बिरुदं मिरवणाऱ्या अन्‌ खानदेशचे प्रवेशद्वार असलेल्या नाशिकभोवतीच्या महामार्गांची चाळण झालेली असून, ते मृत्यूचे सापळे बनलेत. नाशिक शहर हद्दीत दहा महिन्यांत झालेल्या अपघातात प्राण गमवावा लागलेल्या १३९ पैकी ७८ दुचाकी, तर १० चारचाकीचालकांचा समावेश आहे.

तीर्थक्षेत्र, कृषी पंढरी, वाइन कॅपिटल अशी बिरुदं मिरवणाऱ्या अन्‌ खानदेशचे प्रवेशद्वार असलेल्या नाशिकभोवतीच्या महामार्गांची चाळण झालेली असून, ते मृत्यूचे सापळे बनलेत. नाशिक शहर हद्दीत दहा महिन्यांत झालेल्या अपघातात प्राण गमवावा लागलेल्या १३९ पैकी ७८ दुचाकी, तर १० चारचाकीचालकांचा समावेश आहे. सिन्नर तालुक्‍यात जूनपासून सत्तरवर जणांनी प्राण गमावले. दीडशे जण गंभीर जखमी झालेत. इगतपुरी भागामध्ये ३१ अपघातांत १९ जणांचा मृत्यू अन्‌ २० जण जायबंदी झालेत.

जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. करमाळा ते नगर हा रस्ता इतका उखडलाय, की पूर्ण ट्रक मावेल इतके मोठ्या आकाराचे खड्डे पडलेत.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्‍यातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मराठवाड्यात जायचे कसे असा प्रश्‍न आहे. मालेगाव-मनमाड, मालेगाव-नांदगाव हे मार्ग वाहतूकयोग्य राहिलेले नाहीत. चंदनपुरी-निमगाव या पर्यायी मार्गाचा वापर होतो. देवळ्यातील भाबड बारीतून जाताना प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. जिल्ह्याच्या सर्वदूर भागात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती आहे. विल्होळी ते कसारादरम्यान मुंबई-आग्रा महामार्गाची चाळण झाली आहे. उखडलेल्या कच आणि डांबरामुळे वाहने आदळताहेत.

घोटी-सिन्नर रस्त्याचे तेरा किलोमीटरचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने धूळ आणि खड्ड्यांमुळे भंबेरी उडते. निफाड-औरंगाबाद महामार्ग अनेक ठिकाणी फाटलाय. येवल्यातून नाशिक, औरंगाबाद आणि नगर-मनमाड, धुळे महामार्ग जातो. टोल असूनही मनमाड ते कोपरगाव दरम्यान मोठे खड्डे पडलेत. नाशिक-येवला रस्ता खड्ड्यात गेलाय. पिंपळसे ते येवल्यापर्यंत जीव मुठीत धरून जावे लागते. मणके खिळखिळे होताहेत. नगर-मनमाड मार्गावर अपघात वाढलेत. 

औरंगाबाद मार्ग वर्षभरापासून बंद 
जळगाव - जिल्ह्यात १० हजार ७८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील पावणेचार हजार किलोमीटर रस्त्यांची चाळण झाली आहे. जळगावपासून अजिंठा आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षभरापासून बंद आहे. खोदलेल्या रस्त्यामुळे औरंगाबाद-जळगाव प्रवासाला चारऐवजी सहा-सात तास लागतात. रस्त्याच्या या स्थितीने परदेशी पर्यटकांनी अजिंठ्याकडे वर्षभरापासून पाठ फिरवली आहे. चिखली-तरसोद रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. या मार्गाची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. जळगाव-धुळे महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात वर्षभरात ७४ जणांचा बळी गेला. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठदुखी, कंबरदुखी, मानेत अंतर पडणे असे आजार वाढल्याचे डॉ. चित्तरंजन चौधरी यांनी सांगितले. 

अपुरा निधी अन्‌ महामार्गाची दुरवस्था
धुळे - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ६० टक्के रस्ते खराब झालेत. जिल्ह्यात साडेतीन हजार, तर धुळे महापालिका क्षेत्रात सातशे किलोमीटरचे रस्ते आहेत. ३० टक्के कायमस्वरूपी नादुरुस्त असतात. अतिवृष्टीमुळे आणखी ३० टक्के नादुरुस्त झाल्याने खड्डेमय रस्ते जिवावर उठलेत. निधी वेळेत मिळत नसल्याने कामे रखडलीत. महामार्गांसह शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाट लागली आहे. महापालिका क्षेत्रात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सतत ब्रेक, क्‍लचच्या वापराने मान, पाठ, कंबर, खांदे आणि स्नायूदुखीचे आजार वाढल्याचे डॉ. संजय संघवींनी सांगितले. खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह चौघांनी प्राण गमावलेत.

नंदुरबारमधील महामार्ग खड्ड्यात
नंदुरबार - जिल्ह्यात सुमारे चार हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यातील काम रखडलेल्या रस्त्यांसह ८० टक्के रस्त्यांची चाळण झाली आहे. बऱ्हाणपूर-शिरपूर-अक्कलकुवा ते अंकलेश्‍वर तसेच धुळे-साक्री-नवापूर-सुरत हे मुख्य महामार्ग आहेत. त्यांची कामे दीड वर्षापासून बंद आहेत. दिवसाला दोन अपघात नित्याचे आहेत. 

खरंच कधी मिळणार निधी?
नगर - जिल्ह्यातील २० हजार ७४२ किलोमीटरपैकी १० हजार ४४६ किलोमीटर रस्त्यांची वाट लागली आहे. जिल्हा परिषदेला रस्ते ठीक करण्यासाठी २६ कोटींची आवश्‍यकता असली तरी निधी कधी मिळणार? हा प्रश्‍न आहे. ऑक्‍टोबरमधील पावसाचा सर्वाधिक फटका उत्तर भागाला बसला. रस्ते खराब झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळणावर परिणाम झालाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highway accident increase dangerous