अस्मितेची द्वाही फिरविणारा शिवराज्याभिषेक 

अस्मितेची द्वाही फिरविणारा शिवराज्याभिषेक 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र, सार्वभौम हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामीच्या मानसिकतेला छेद दिला व समाजात अस्मितेची द्वाही फिरविली. यातून महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व भूमिपुत्रांना, या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे, असे आश्‍वस्त केले. 

साधारणपणे महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास दोन-अडीच हजार वर्षांचा आहे. त्यात अनेक छोट्या-मोठ्या घटना दडल्या आहेत. शेकडो राजे व राज्ये उदयाला आली, तशीच लयाला गेली. अशी थोडी राज्ये आहेत, ज्यांचे स्मरण आजही केले जाते. असे फारच कमी राजे आहेत, की जे अजूनही स्वतंत्र भारतातील लोकांना स्वातंत्र्य, अस्मिता व देशाभभिमानाची प्रेरणा देतात. त्यापैकी एक राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. त्याचे राजे म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शिवचरित्र महाराष्ट्राच्या एकूण ऐतिहासिक जीवनात मोलाचा ठेवा मानला जातो. शिवचरित्रातील सर्वात महत्त्वाची घटना कोणती, असा प्रश्‍न विचारला तर कोणीही अभ्यासक क्षणाचाही विलंब न करता उत्तर देईल ते म्हणजे, "छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक'. हा राज्याभिषेक यासाठी महत्त्वाचा आहे, की महाराष्ट्राच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात असा महन्मंगल क्षण दुसरा दिसत नाही. एवढे महत्त्व राज्याभिषेकाला येण्याचे कारण असे, की या राज्याभिषेकाने या देशामधील मध्ययुगात एक स्वतंत्र, सार्वभौम राज्य निर्माण केले. शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले, त्या वेळी दक्षिण व उत्तरेत शेकडो राजे होते. पण, एक दिल्लीची पातशाही सोडली, तर खऱ्या अर्थाने कोणीही सार्वभौम नव्हते. राजस्थानमध्ये राजे होते. जाट राजे होते. दक्षिणेत नायक होते. आदिलशहा, कुतुबशहाही होता. ते स्वत:ला स्वतंत्र मानत असले, तरी कागदोपत्री व व्यवहारात ते दिल्लीपतीचे मांडलिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ स्वतंत्र नव्हते, तर सार्वभौम होते. म्हणजे घटनात्मकदृष्ट्या विचार करता दिल्लीची पातशाही जेवढी स्वतंत्र व सार्वभौम होती, तेवढीच शिवाजी महाराजांनी दक्षिणेत स्थापन केलेली मराठ्यांची सत्ता स्वतंत्र व सार्वभौम होती. 

प्रत्यक्ष दिल्लीपतीला आव्हान 

औरंगजेबाला सर्वात मोठा धोका हा उदयोन्मुख अशा मराठा सत्तेपासून वाटू लागला. त्याला आदिलशहा, कुतुबशहाची मुळीच भीती नव्हती. त्याला धास्ती वाटत होती, मराठ्यांच्या सत्तेची. घटनात्मक दृष्टिकोनातून या घटनेला जे महत्त्व होते, ते औरंगजेबाने जाणले होते. राज्यशास्त्रानुसार आव्हान देणारी मराठ्यांची सत्ता निर्माण होणे म्हणजे प्रत्यक्ष दिल्लीपतीला आव्हान होते. राज्याभिषेकाचे आणखी एक मोठे महत्त्व आहे. ते म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामीच्या मानसिकतेला छेद दिला. ही गुलामीची मानसिकता आमच्याच धर्मपंडितांनी निर्माण केली होती. ती अशी, की परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. त्यामुळे आता पृथ्वीतलावर कोणी क्षत्रिय राहिलेला नाही. क्षत्रियच नसल्याने हिंदूपैकी कोणी राजा होऊ शकत नाही. अकबराच्या काळात कृष्ण-नृसिंहशेष धर्मपंडिताने "शुद्राचारीशिरोमणी' हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथात त्याने हा सिद्धांत सांगितला आहे. म्हणजे राज्याभिषेक करताना शिवरायांना स्वकियांच्या पराभूत गुलामीच्या मानसिकतेवर मात करायची होती. त्यांनी त्यासाठी मुत्सद्देगिरीने पावले टाकली. महाराष्ट्रातल्या ज्या ब्राह्मण पंडितांनी त्यांना विरोध करण्यासाठी कुजबूज केली, त्या वेळी त्यांच्या शंका-कुशंकांचे निराकरण करण्यासाठी महाराजांनी त्या काळातील हिंदू जगतातील प्रति "व्यास' म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा काशीच्या गागाभट्टांना पाचारण केले. गागाभट्टांचा शब्द धर्मशास्त्रात, वादविवादात त्या काळात अंतिम मानला जात होता. गागाभट्टांनी महाराष्ट्रात येऊन धर्मशास्त्रातले दाखले देऊन "या जगात क्षत्रिय आहेत, शिवाजी महाराजांचे कूळ क्षत्रिय आहे आणि त्यांना राज्याभिषेक करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे', हे ठणकावून सांगितले. ते सर्वांना मान्य करावे लागले. या सर्व पार्श्‍वभूमीचा विचार करता, हिंदू समाजाची एकूण मानसिकता किती पराभूत स्थितीला गेली होती हे ध्यानात येते. अशा समाजात एक प्रकारची अस्मिता निर्माण करण्याचे काम राज्याभिषेकाने केले. 

शिवाजी महाराजांची दूरदृष्टी 
एक लक्षात घेतले पाहिजे की, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, तो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे केला आणि तो तसा करणे आवश्‍यक होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे राज्य फक्त हिंदूंकरिता निर्माण झाले असे नाही.
शिवरायांचे राज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रापासून पूर्णपणे फारकत न घेता शास्त्र व परंपरा सांभाळून महाराजांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर सर्व देशातल्या भूमिपुत्रांना आश्‍वस्त केले. या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे. आपल्या राज्यघटनेतसुद्धा राष्ट्र म्हणून भारत कसा असेल, याचे प्रास्ताविकेत दिग्दर्शन केलेले आहे. त्यातील दोन शब्द महत्त्वाचे आहेत - भारत हा "स्वतंत्र' व "सार्वभौम' असेल. ही जी संकल्पना आहे, ही कल्पना सुचणेसुद्धा अचंबित करणारी गोष्ट आहे. त्यावरून शिवरायांची दूरदृष्टी लक्षात येते. 

(शब्दांकन - संदीप खांडेकर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com