esakal | ख्रिसमससाठी गाइडलाईन्स जाहीर, ख्रिश्चन बांधवांना गृहमंत्र्यांचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

ख्रिसमससाठी गाइडलाईन्स जाहीर, ख्रिश्चन बांधवांना गृहमंत्र्यांचं आवाहन

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी नाताळ उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

ख्रिसमससाठी गाइडलाईन्स जाहीर, ख्रिश्चन बांधवांना गृहमंत्र्यांचं आवाहन

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी नाताळ उत्सव (Christmas) साध्या पद्धतीने आणि गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही आणि शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. विशेष म्हणजे चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

शारिरीक अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळावे

नाताळ सणाच्या दरम्यान चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री असे काही वस्तू ठेवल्या जातात. ते पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्या ठिकाणी देखील शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) आणि स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा (Choirsters) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

हेही वाचा-  मेट्रो-३ मार्गिकेच्या सीप्झ स्थानकातील स्लॅबचे बांधकाम पूर्ण

आपल्या घरातील 60 वर्षावरील नातेवाईक तसेच 10 वर्षाखालील लहान बालक यांच्या सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. शक्यतोवर त्यांनी घराबाहेर जाणे टाळावे आणि नाताळ घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची (Online Masses) सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. ज्याचा लाभ घरी असणाऱ्या व्यक्तींनाही होईल. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्याची आतिषबाजी करु नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे आणि तरतूदींचे काटेकोर पालन करावे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

31 डिसेंबरला चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना (Thanks Giving Mass) ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7.00 वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करता येईल का हे पहावे, असे आवाहन देखील अनिल देशमुख यांनी केले आहे.

Home minister anil deshmukh announced guidelines for christmas

loading image