अमरावती हिंसाचार : 'रझा अकादमीसह अन्य घटकांचा करणार तपास', गृहमंत्र्यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

अमरावती हिंसाचार : 'रझा अकादमीसह अन्य घटकांचा करणार तपास', गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई : अमरावतीमध्ये बंदला हिंसक (amravati violence) वळण लागल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. चार दिवसांची ही संचारबंदी असून इंटरनेट देखील चार दिवस बंद राहणार आहे. तसेच रझा अकादमी असेल किंवा आणखी कोणी असेल त्यांच्यासंदर्भात चौकशी केली जाईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) म्हणाले.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : पोलिसांनी भाजपच्या माजी मंत्र्याला केले स्थानबद्ध

''अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या कर्फ्यू असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. आज भाजपच्या वतीने अमरावती ग्रामीणमध्ये बंदची हाक दिली आहे. मात्र, सध्या ग्रामीणमध्ये पोलिस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नांदेड, मालेगाव, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. या प्रकरणी जो दोषी आहे त्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. रझा अकादमी असेल किंवा कोणीही दोषी असेल त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल'', असेही वळसे पाटील म्हणाले.

त्रिपूरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले. त्याचा निषेध करण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपने बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये अनेक दुकांनांची जाळपोळ करण्यात आली. बंदला हिंसक वळण लागल्यानंतर अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महाराष्ट्र पोलिसांची अभिमानास्पद कारवाई -

''महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत केलेली ही मोठी कारवाई आहे. कदाचित देशातील ही मोठी कारवाई आहे. गडचिरोलीत ऑपरेशन सकाळी ६ वाजता सुरू झाले होते. सायंकाळी ४ वाजता हे ऑपरेशन संपले. सध्या तिथे आमचे पुरेसे पोलिस दल आहे. त्यामुळे अधिक कुमक पाठविण्याची गरज नाही. कोणालाही अभिमान वाटेल अशी कारवाई महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे. अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू असून काही मृतदेहांची ओळख पटलेली आहे, तर अजूनही काही मृतदेहांची ओळख पटविणे सुरू आहे'', असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

loading image
go to top