होमगार्डना किमान सहा महिने ड्यूटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जिल्हा समादेशक हे पद "वेतनी' केले. त्यानंतर पंधरा दिवसांतच शासनाने आता गृहरक्षक दलाच्या जवानांनाही वर्षातून किमान सहा महिने ड्यूटी देण्याचे ठरविले आहे.

जळगाव - गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जिल्हा समादेशक हे पद "वेतनी' केले. त्यानंतर पंधरा दिवसांतच शासनाने आता गृहरक्षक दलाच्या जवानांनाही वर्षातून किमान सहा महिने ड्यूटी देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जिल्ह्यात पटावर असलेल्या गृहरक्षक दलातील जवानांची साखळी पद्धतीने नियुक्ती होणार असून, संबंधित आयुक्त, अधीक्षकांकडून त्याबाबतचे प्रस्ताव गृह विभागातर्फे मागविण्यात आले आहेत. 

राज्यात कायदा- सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, विशेषत: सण- उत्सवांच्या काळात पोलिस दलास खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांचे योगदान मोठे आहे. परंतु, हे पद तात्पुरत्या सेवेचे व मानधन तत्त्वावरील आहे. ज्या दिवशी ड्यूटी त्या दिवसाचे वेतन, अशी पद्धत आजपर्यंत चालत आली असून, सद्य:स्थितीत गृहरक्षक दलाच्या जवानांना शंभर दिवसही ड्यूटी मिळत नव्हती. त्यामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, वेतन नाही तर किमान पूर्ण वर्षभर ड्यूटी मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. 

आता सहा महिने ड्यूटी 
अन्य मागण्यांसंदर्भातही मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मार्च 2019 मध्ये होऊन तीत गृहरक्षक दलाला किमान 50 टक्के (सहा महिने) कर्तव्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गृहरक्षक दलाच्या महासमादेशकांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना नुकतेच पत्र दिले. त्यानुसार सण- उत्सवांतील नियुक्तीसोबतच वाहतुकीचे नियमन, रुग्णालय सुरक्षा, शासकीय वसतिगृहांमधील सुरक्षा, कारागृहाबाहेरील सुरक्षा, अशा कामांसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांना किमान सहा महिने ड्यूटी देता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeguard at least six months duty

टॅग्स