बेघरांना कोणी जागा देणार का!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

राज्यातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल दिले जात आहेत. ज्या लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी स्वत:ची जागाच नाही, अशांना जागा खरेदीसाठी अनुदान दिले जाते. 2016-17 ते 2018-19 या कालावधीत राज्यातील जागा नसलेल्या 12 हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट संबंधित जिल्ह्यांना दिले.

राज्यातील 1.70 लाख लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्णच
सोलापूर - राज्यातील बेघरांना घर बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यास शासनाकडून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. दरम्यान, घर बांधण्याकरिता जागा नसलेल्यांच्या सर्व्हेनुसार राज्यातील एक लाख 70 हजार 328 लाभार्थ्यांना जागेची गरज आहे. मात्र, मागील तीन वर्षांत त्यापैकी फक्‍त तीन हजार लाभार्थ्यांनाच जागेसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वत:च्या मालकीची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना स्वप्नातील घराची प्रतीक्षाच असल्याचे चित्र पाहायला मिळते.

राज्यातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल दिले जात आहेत. ज्या लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी स्वत:ची जागाच नाही, अशांना जागा खरेदीसाठी अनुदान दिले जाते. 2016-17 ते 2018-19 या कालावधीत राज्यातील जागा नसलेल्या 12 हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट संबंधित जिल्ह्यांना दिले. मात्र, मागील तीन वर्षांत त्यापैकी केवळ दोन हजार 923 जणांनाच जागा खरेदीचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे स्वत:ची जागा नसल्याने उन्हाळा असो की हिवाळा- पावसाळा, उर्वरित लाभार्थ्यांना उघड्यावर अथवा कच्च्या, छपराच्या घरातच राहावे लागत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वाळू व पाणीटंचाईमुळे अनेक घरकुलांची कामे रखडल्याचेही दिसून येते.

प्रधानमंत्री आवास योजना, शबरी, इंदिरा आवास अशा योजनांच्या माध्यमातून घरकुल बांधकामासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांचे मागील तीन वर्षांसाठी 12 हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. परंतु, त्यापैकी तीन हजार लाभार्थ्यांना रक्‍कम दिली आहे. जागा महाग असल्याने हे अनुदान कमी पडते आणि त्यामुळे लाभार्थ्यांनी या अनुदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.
- मंजिरी टकले, उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, मुंबई

राज्यातील सद्यःस्थिती
जागा नसलेले लाभार्थी - 1.70 लाख
मागील तीन वर्षांतील उद्दिष्ट - 12,000
अनुदान मिळालेले लाभार्थी - 2,923
अनुदानाच्या प्रतीक्षेत - 1.67 लाख

Web Title: Homeless Place Gharkul Government