esakal | दहावीचे मुल्यांकन कसे होणार? शिक्षण मंडळाच्या निर्णयाची प्रतीक्षा

बोलून बातमी शोधा

school
दहावीचे मुल्यांकन कसे होणार? शिक्षण मंडळाच्या निर्णयाची प्रतीक्षा
sakal_logo
By
मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे (state Board of Education)- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) तर दहावीच्या (10th class) विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यांकन कसे करावे आणि निकाल कसे द्यावेत, हे जाहीर केले. मात्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचा संभ्रम वाढत आहे. परंतु ‘सीबीएसई’च्याच धर्तीवर राज्य शिक्षण मंडळाची दहावीच्या अंतर्गत मुल्यांकन पद्धती असण्याची शक्यतेला मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ञांकडून दुजोरा मिळत आहे. त्यामुळे काही शाळांनी त्यादृष्टीने पूर्व तयारी देखील सुरू केली आहे. आता राज्य शिक्षण मंडळाकडून (Board of Education) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची मुल्यांकन पद्धती अधिकृतरित्या जाहीर होण्याची प्रतीक्षा सर्वांनी लागली आहे. (How will the 10th class be evaluated decision of the Board of Education)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय २० एप्रिल रोजी जाहीर केला. त्याचवेळी दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनावर जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र राज्य सरकारने हा निर्णय जाहीर करून पंधरा दिवस होत आले, तरी अद्याप राज्य सरकारने दहावीचा निकाल कसा लावायचे, याबाबतचे धोरण स्पष्ट केलेले नाही. याबाबत राज्य शिक्षण मंडळ आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सातत्याने विचारण्यात येत आहे. परंतु कोणतेही ठोस उत्तर दिले जात नसल्याचे दिसून येते. दरम्यान, दहावीचा निकाल देण्यासाठी अंतर्गत मुल्यांकन कसे करावे!, याबाबत काही मुख्याध्यापकांशी संवाद साधला असता त्यांनी मुल्यांकनाचे काही पर्याय सूचविले आहेत.

हेही वाचा: जेईई मुख्य परीक्षा, मे २०२१ स्थगित; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनाचे पर्याय :

- शाळांमध्ये वर्षभर घेतलेल्या घटक आणि सत्र चाचण्या, सराव परीक्षा यांच्या सरासरी गुणांवर आधारित निकाल

- शाळांनी घेतलेल्या छोट्या-छोट्या ‘टेस्ट’च्या आधारे मुल्यांकन

- विद्यार्थ्यांना करण्यासाठी दिलेले गृहपाठ, करवून घेतलेले लेखन, प्रकल्प याद्वारे व्हावे मुल्यांकन

- विद्यार्थ्यांचा शाळेतील मागील काही वर्षांच्या शैक्षणिक कामगिरीचा आधार घेणे (उदा. इयत्ता पाचवी ते नववी, किंवा सातवी ते नववीचा निकाल पाहणे)

- शक्य असल्यास शाळांनी ऑनलाइनद्वारे बहुपर्यायी प्रश्न देऊन विद्यार्थ्यांकडून ते सोडवून घ्यावेत, आणि त्या आधारे निकाल

हेही वाचा: उन्हाळ्याच्या सुट्ट्या 1 मेपासून; शिक्षण विभागाने केलं स्पष्ट

विद्यार्थ्यांच्या संकलित शैक्षणिक कामगिरी पाहून व्हावे मुल्यांकन

‘‘वर्षभरात घेतलेल्या चाचणी परीक्षा, गृहपाठ असे विविध पर्यायांवर आधारित दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यांकन करता येईल. परंतु दहावीचा निकाल हा शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असल्याने ‘क्युमिलेटिव्ह रेकॉर्ड’ एखाद्या विद्यार्थ्यांचे संकलित नोंदीवरून मुल्यांकन करणे, हे अधिक संयुक्तिक वाटते. यामध्ये शाळांकडे उपलब्ध असणारे विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवीपासून ते नववीपर्यंतचे, किंवा सातवी ते आठवीपर्यंतचे शैक्षणिक कामगिरीचा आलेख पाहून मुल्यांकन आणि त्यावर आधारित निकाल जाहीर करणे शक्य आहे.’’, असं शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले.

दहावीचा निकाल वर्षभरातील ‘टेस्ट’वर आधारित असावा

‘‘शाळांनी वर्षभर विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारे ‘टेस्ट’ घेतल्या आहेत. काही गृहपाठ, प्रकल्प करून घेतले आहेत. त्याशिवाय वर्कशीट देऊन अभ्यास करवून घेतला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात सराव परीक्षा (प्रिलियम) घेतल्या आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल देताना या पद्धतीने झालेल्या मुल्यांकनावर आधारित अंतिम निकाल असावा,’’, असं सुंदरबाई मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी म्हणाले.