बारावीची परीक्षा आजपासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसावा, याकरता राज्यात 250 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

मुंबई - बारावीची परीक्षा मंगळवार (ता. 28)पासून सुरू होत आहे आणि ती 25 मार्चला संपेल. मुंबईतून तीन लाख 40 हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.

यंदा या परीक्षेला 15 लाख पाच हजार 365 विद्यार्थी बसले आहेत. त्यात आठ लाख 48 हजार 929 विद्यार्थी आणि सहा लाख 56 हजार 426 विद्यार्थिनी आहेत. परीक्षेसाठी राज्यात दोन हजार 710 परीक्षा केंद्रे आहेत. विज्ञान शाखेचे पाच लाख 59 हजार 423, कला शाखेचे पाच लाख नऊ हजार 124, वाणिज्य शाखेचे तीन लाख 73 हजार 870 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचे 62 हजार 948 विद्यार्थी परीक्षा देतील.

विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी पेपरमध्ये खंड ठेवण्यात आले आहेत. स्वमग्न (ऑटिस्टिक) विद्यार्थ्यांसाठी बारावी आणि दहावीच्या परीक्षेत गणित, बुक किंपिंग, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांच्या पेपरसाठी कॅलक्‍युलेटर (गणक) वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे; परंतु विद्यार्थ्यांना स्वतःचे कॅलक्‍युलेटर आणावे लागेल. ते सामान्य असावे. मोबाईल किंवा अन्य इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधनांमधील कॅलक्‍युलेटर वापरता येणार नाही, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

बारावी परीक्षेसाठी  
बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसावा, याकरता राज्यात 250 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपी बहाद्दरांना रोखण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याची विनंती केली आहे. मंडळाचे सदस्य, मुख्य अधिकारी यांची परीक्षा केंद्रांच्या भेटीदरम्यान केंद्र परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इंग्रजी आणि गणिताच्या परीक्षेवेळी बैठे पथक नेमण्याची सूचना विभागीय मंडळातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. कॉपी प्रकरणे कमी करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत पालकसभा, विद्यार्थ्यांचे प्रबोधन, परीक्षेत कॉपी न करण्याची प्रजासत्ताकदिनी शपथ घेणे आदी कार्यक्रम राबवण्यात आले होते.

Web Title: HSC exam started today