
सोलापूर : जिल्ह्याची लोकसंख्या ५० लाखांवर पोचली असून सध्या शिक्षण व नोकरीच्या स्पर्धेत विवाहाचे वय वाढू लागल्याने एक किंवा दोन अपत्यावर कुटुंब नियोजन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मागील तीन वर्षांत सोलापूर शहर-जिल्ह्यातील ३६ हजार पती-पत्नींनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पूर्वी विशेषतः ग्रामीणमध्ये २५-३० वर्षांपूर्वी एका कुटुंबात सरासरी आठ ते दहा सदस्य असायचे. शिक्षण, नोकरीसाठी फार स्पर्धा नव्हती आणि जगण्यासाठी खूप पैसा कमाविण्याची अपेक्षा देखील नव्हत्या. वयाच्या विसाव्या वर्षांतच विवाह होत होते. पण, आता वयाच्या २५ वर्षांपर्यंत शिक्षण, त्यानंतर नोकरीसाठी संघर्ष आणि ३० व्या किंव्या ३५ व्या वर्षी आर्थिक स्थैर्य आल्यानंतर विवाह, अशी स्थिती आहे. पुढे नोकरीतील स्पर्धा, उच्च पदांपर्यंत जाण्याचे स्वप्न आणि त्यातच मुलांच्या शिक्षणावरील वाढलेला खर्च, रोजच्या कामातून मुलांचा सांभाळ करण्याची कसरत, दूषित झालेले सामाजिक वातावरण, अशा कारणांमुळे मागील चार-पाच वर्षांत ‘हम दो हमारा एक किंवा दोनच’ असा विचार करणाऱ्यांची संख्या वाढली.
दुसरीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे आयुर्मान देखील कमी झाले असून सध्याचे आयुर्मान सरासरी ७५ पर्यंतच, हेही त्यामागे कारण आहे. लोकसंख्या वाढीवरील नियंत्रणासाठी ‘हम दो हमारे दोन’चा नारा दिला जातो, पण अनेकजण विवाहच करत नाहीत आणि अनेकजण एकाच अपत्यावर कुटुंब नियोजन करत आहेत. त्यामुळे शाळांमधील पटसंख्या देखील दिवसेंदिवस कमी होत असल्याचे शिक्षण विभागाचे निरीक्षण आहे.
तीन वर्षांतील आकडेवारी
सन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
२०२२-२३ १२,४५६
२०२३-२४ ११,४७३
२०२४-२५ १२,५०२
एकूण ३६,४३१
मुलगा-मुलगी यातील भेद आता जनजागृतीमुळे कमी
सरकारी दवाखान्यांमध्ये प्रसूतीसह कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत आहे. मुलगा-मुलगी यातील भेद आता जनजागृतीमुळे कमी झाला आहे. सरकारी नोकरी व निवडणूक लढण्यासाठी दोनच अपत्यांची असलेली अट, अशा कारणांमुळे सध्या एक किंवा दोन अपत्यांवर कुटुंब नियोजनाची शस्रक्रिया करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
काकाही नाही, मावशीही नाही
२५ ते ३० वर्षांपूर्वी एकत्रित कुटुंबामुळे भावाबहिणींची संख्याही मोठी होती. त्यातून पुढे पणजोबा, आजी-आजोबा, आई-वडील, मावशी, मावस भाऊ-बहीण, चुलत भाऊ, मामा, काका, असा नात्यांचा विस्तार झाला. अडचणीच्या काळात या नात्यांचा प्रत्येकाला आधार होता. पण, सध्या एक किंवा दोन अपत्यांवर कुटुंब नियोजन करणारे वाढत असून हे प्रमाण असेच राहिल्यास आगामी ५० वर्षांत त्यातील बरीच नाती नष्ट होतील आणि मुलांना सख्खे, मावस, चुलत अशा नात्यांची माहिती पुस्तकातून द्यावी लागेल, अशीही चिंता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.