ते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ : धनंजय मुंडे

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपला 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाचाही विसर पडला आहे.

-  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

पुणे : भाजपकडून देशातील काही भागात 'संपर्क फॉर समर्थन' अभियान राबविले जात आहे. त्यावर आज (रविवार) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी वाढल्याचा फरक माधुरी दीक्षितवर होणार आहे का, असा सवाल करत ते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानाची खिल्ली उडवली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा 19 वा वर्धापन दिवस आणि हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपानिमित्त पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आदी उपस्थित आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले आहेत.

या मेळाव्यात मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपला 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाचाही विसर पडला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानच्या खिल्ली उडवली.

ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी वाढल्याचा फरक माधुरी दीक्षितवर होणार आहे का, असा सवाल करत ते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ, ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणाऱ्या सामान्य माणसाकडे जाऊ. ते कपिल देवकडे गेले तर आपण बळीदेवाकडे जाऊ, असे मुंडे म्हणाले. 

Web Title: if they go to madhuri dixit then we will go to the workers says Dhananjay Munde