इच्छामरण देत नसाल तर कर्जमाफी द्या! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - नाशिक जिल्ह्यातील नगरसूल (ता. येवला) येथील शेतकऱ्याने कांद्याला भाव न मिळाल्याने आपले पाच एकरांतील कांद्याचे उभे पीक जाळून टाकले.

मुंबई - नाशिक जिल्ह्यातील नगरसूल (ता. येवला) येथील शेतकऱ्याने कांद्याला भाव न मिळाल्याने आपले पाच एकरांतील कांद्याचे उभे पीक जाळून टाकले. त्यानंतर राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील किंवा पक्षातील एकही पदाधिकारी धीर देण्यासाठी आला नसल्याची खंत वाटते, असे नमूद करत, सरकार जर शेतकऱ्याच्या संकटात धीर देऊ शकत नसेल, तर इच्छामरण घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी याचना व्यथित शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचा दाखला देत, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आर्थररोड कारागृहातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वहस्ताक्षरातील पत्र पाठवून, या घटनेकडे गांभीर्याने लक्ष वेधत, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देणार नसाल, तर कर्जमाफी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, तातडीने कर्जमाफीबाबत निर्णय घ्या, अशी मागणी केली आहे. 

भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे, की शेतकरी डोंगरे यांनी मुलाप्रमाणे वाढविलेल्या उभ्या कांदा पिकाला छातीवर दगड ठेवून स्वतःच्या हाताने आग लावली. कुटुंबातील सदस्याला अग्निडाग देण्यासारखं अघोरी आणि दुर्दैवी असं धाडसी कृत्य होतं ते. कारण आपल्या उभ्या पिकाचं नुकसान शेतकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी कधीच पाहू शकत नाही. डोंगरे यांनी केलेली घटना व व्यक्त केलेली इच्छामरणाची याचना ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याची हीच अवस्था आहे. ते नाइलाजाने आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. 

सतत काबाडकष्ट करून शेती पिकवणारा शेतकरी अतिशय स्वाभिमानी आहे, त्याला सरकारकडून उपकार नको आहेत. त्याला हवा आहे, त्याच्या शेतमालाला उत्पन्नावर आधारित रास्त हमी भाव! तो तुम्ही देऊ शकत नाही; म्हणून त्याला कर्जमाफीसाठी याचना करावी लागत आहे. "शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी ते कर्जबाजारी होणार नाहीत यासाठी उपाययोजना करणार', असे आपण नेहमी म्हणता. वर्षानुवर्षे जर उत्पादन खर्चसुद्धा निघत नसेल तर शेतकरी कर्जबाजारी होणे स्वाभाविक आहे. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सर्वांत महत्त्वाची उपाययोजना म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव, तो जर आपण देऊ शकत नसाल तर त्याला कर्जमाफी देणे हा त्याचा हक्क आहे. शेतकऱ्यांना भीक नको, त्यांना हवीय हक्काची कर्जमाफी. ती जर देणार नसाल तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

सरकार हे मायबाप असते. त्यांना आता गरज आहे; मायबाप सरकारच्या आधाराची. आपणासारखे संवेदनशील मुख्यमंत्री आणि आपले सरकार कृष्णा डोंगरे यांच्यासह राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या व्यथांचा सहानुभूतिपूर्वक विचार करेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे भुजबळ यांनी शेवटी म्हटले आहे. 

Web Title: If you are not willing to pay the debt waiver death!