Kolhapur Riots : 'चिंता, फूटपाड्या उद्योगांना साथ मिळण्याची'; वाचा 'कोल्हापूर दंगली'वर परखड भाष्य करणारा लेख

कोल्हापुरातील तणावाच्या निमित्तानं नेहमीच्या राजकारणापलीकडं जाऊन कोल्हापूरचा नव्यानं आत्मशोध घेता येईल का, हा मुद्दा असला पाहिजे.
Kolhapur Riots
Kolhapur Riotsesakal
Summary

कोल्हापुरात हिंदूंना धोका वाटावा, असं काहीही घडलेलं नाही. समाजमाध्यमी उठवळपणानं काही बिघडावं इतका हा धर्म लेचापेचाही नाही.

एका बाजूच्या कडवेपणाला तसंच दिलं जाणारं उत्तर सामान्य माणसालाच भरडणारं असतं, याचं दर्शन कोल्हापूरनं घेतलं. दोन दिवस तणाव आणि दंगलीचं वातावरण, तसेच त्यावर इंटरनेटबंदीसारखे अतर्क्य उपाय योजणाऱ्या यंत्रणांमुळं फूट पाडणाऱ्यांचं नुकसान काहीच होत नाही.

हातावरचं पोट असणारेच यात झळा सोसतात, हे घडल्यानंतर कोल्हापुरातील सर्वसाधारण जनमानस ‘झालं ते काही बरं नव्हे, कोल्हापूर असं नव्हतं,’ असं सांगत हे अजून सारं बिघडलेलं नाही, असा किमान दिलासा देणारं लक्षण आहे. त्याचं स्वागत करतानाच कोल्हापुरात अशी अस्वस्थता यावी, याची स्पष्ट चिकित्सा केली पाहिजे.

सहिष्णुतेचा, सहअस्तित्वाचा धागा बळकट ठेवणाऱ्या गावाचा हा नवा रंग गडद होणार नाही, याची दक्षताही घेतली पाहिजे. बहुजनवाद रुजलेल्या कोल्हापुरात बहुसंख्याकवादानं मूळ धरणं मागच्या शतकभराची वाटचाल बदलणारे आहे. या दंगलीत आर्थिक नुकसान झालं त्याहून भावनिक, मानसिक दुहीची रुजवण होत आहे, हे अधिक चिंताजनक.

Kolhapur Riots
Karnataka : बुद्ध-बसव-आंबेडकरांना मानणारा नेता बनला बेळगावचा 'पालकमंत्री'; मुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती

'आपला इतिहास अभिमानास्पद आहे'

आपला इतिहास अभिमानास्पद आहे म्हणूनच तशाच वर्तमान आणि भविष्याची हमी देता येत नाही. त्यासाठी मूल्यांवर सतत काम करावं लागतं, आग्रह धरावा लागतो, तसं न करता ‘चर्चासत्री’ थाटाच्या उपक्रमात अडकलेले सहृदयी विद्वान आणि शांततेच्या बाजूनं असलेले; पण समाजमाध्यमांतूनच जगाला संदेश देणारे शांततादूत समाजाची दिशा बदलण्याचा जो खेळ अत्यंत ठोसपणे सुरू आहे, त्याचा रेटा थांबवू शकत नाहीत.

दंगलीचं राजकारण करू नये, हा सुविचार चांगलाच; पण अशा घटना मतांचं पीक काढण्यासाठी उपयोगाच्या वाटत असतील आणि तशा ठरतही असतील तर त्याला पर्याय का देता येत नाही, याचाही या गावातल्या जाणत्यांनी विचार करायला नको काय? सामान्य माणसांना खास करून तरुणांना भुरळ घालणारी अस्मिता आणि प्रतीकं टोकाच्या प्रवृत्तींच्या ताब्यात जाणं हा शांतताप्रेमी आणि सहअस्तित्ववादी मंडळींच्या दुर्लक्षाचा आणि नाकर्तेपणाचाही परिपाक आहे.

अल्पसंख्य-बहुसंख्य या द्वंद्वात अडकण्याचा धोका

कोल्हापुरातील तणावाच्या निमित्तानं नेहमीच्या राजकारणापलीकडं जाऊन कोल्हापूरचा नव्यानं आत्मशोध घेता येईल का, हा मुद्दा असला पाहिजे. राज्यातील एका पाठोपाठ एक अशा शहरात धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडताहेत. अशा घटनांतून होणाऱ्या समाजातील दुभंगाचा राजकीय लाभ कोणत्या बाजूला होणार याचा अदमास घेतला तरी घटनांनंतरच्या क्रिया प्रतिक्रियांचा अर्थ स्वच्छपणे उलगडायला लागतो. यावर मात करायची तर विचार नव्यानं शोधायची गरज नाही; मात्र तो मांडण्याच्या पद्धती आणि त्यासाठीचे कार्यक्रम ८०-९० च्या दशकातच अडकलेले असतील तर नकळतपणे अल्पसंख्य-बहुसंख्य या द्वंद्वात अडकण्याचा धोका तयार होतो.

देशात बुहसंख्याकवाद रुजत असताना ज्यांना देश वैविध्याचं सन्मान करणारा आणि सर्वसमावेशकतेचं घटनात्मक मूल्यं मानणाराच असला पाहिजे, असं वाटतं, त्यांनी त्यासाठीचा कालसुसंगत कार्यक्रमही ठरवायला हवा. तो केवळ प्रतिक्रियावादी नाही तर नवी रचना मांडणारा असला पाहिजे. तसंच धार्मिक तणाव आणि त्यातून राजकीय लाभहानीची गणितं मांडणारा खेळ हा या वाटचालीचा एक भाग आहे. या खेळाचा पट त्यापलीकडं विस्तारला आहे. तो अंतिमतः समाजाला, देशाला एककल्ली वाटचालीकडं घेऊन जाऊ शकतो, हे समजून घेतलं पाहिजे.

Kolhapur Riots
Karnataka : 'या' दोन बड्या नेत्यांनी उडवली माजी पंतप्रधानांची झोप; आता पक्ष वाचवण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

राजकारणापलीकडं बहुसंख्याकवादी मूल्यं शिक्षणापासून अर्थकारणार्पंयत आणि सांस्कृतिक आघाडीपासून इतिहास- परंपरांच्या आकलनापर्यंत सार्वत्रिक दिसताहेत. तेव्हा धार्मिक तणाव बरा नव्हे, असं वाटत असेल तर अशा सगळ्या आघाड्यांवरची ही लढाई आहे. केवळ राजकीय आणि सत्तेसाठी लाभ याला की, त्याला एवढ्यापुरती ती नाही. कोल्हापुरातील तणाव धक्कादायक वाटत असला तरी तो देशात रुजत चाललेल्या बदलांचाही एक परिणाम आहे. जिथं सलोख्याची आणि सहअस्तित्वाची अत्यंत सशक्त परंपरा आहे, त्या कोल्हापूरचा यात समावेश व्हावा, हे शहरासाठी चिंतेचं कारण असलं पाहिजे.

मोगल बादशहाविषयी संतापाची भावना

कोल्हापुरातील तणाव झाला त्यासाठीचं कारण समाजमाध्यमांवर काही मुलांनी स्टेटस म्हणून ठेवलेल्या औरंगजेबाच्या चित्रानं भावना दुखावल्याचं. हे नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनाच्या दरम्यान घडलं किंवा घडवलं. त्यावरचा संताप स्वाभाविक आहे. तो येणारा हिंदुत्ववादीच असला पाहिजे, असंही काही नाही. याचं कारण औरंगजेबाविषयी ममत्व दाखवावं असं काही नाही. किंबहुना महाराष्ट्रात शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा घास घ्यायला आलेल्या मोगल बादशहाविषयी संतापाची भावना असणार हे उघड आहे.

तेव्हा औरंगजेबाचं कोणत्याही स्तरावरचं उदात्तीकरण प्रतिक्रिया निर्माण करणारं ठरलं, यात नवल नाही. याचा तपास पोलिस करतील. प्रश्‍न याविषयीच्या निषेधाचा नाही. ज्यांनी औरंगजेबाचं चित्र लावलं त्यांच्याविषयीच्या संतापाचाही नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावी, ही मागणीही ठीकच; पण प्रश्‍न त्या स्टेटसच्या निषेधासाठी शहरातील शांततेला वेठीला धरण्याचा आहे. असं भडकावून स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी हिंदुत्ववाद्यांनी करणं स्वाभाविक आहे आणि हिंदुत्ववादी नसणारेही कोल्हापुरात औरंगजेबाचं उदात्तीकरण नको अशीच भूमिका घेताहेत.

चुकीसाठी अख्या समाजाला जबाबदार धरण्यात काय अर्थ आहे?

कारवाईची मागणीही करताहेत. यात मुस्लिम समाजातील मान्यवरांचाही समावेश आहे. तेव्हा शिवरायांविषयीचा आदर आणि औरंगजेबाविषयीची तिरस्काराची भावना या जर कोल्हापुरात सर्वधर्मीयांत आणि निरनिराळ्या वैचारिक छटांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांत समान असतील तर काही मुलांनी केलेल्या चुकीसाठी अख्या समाजाला जबाबदार धरण्यात काय अर्थ आहे? कारवाईची मागणी करता करता जमाव प्रार्थनास्थळांवर दगडफेक करतो किंवा शोधून काही दुकानांवर दगडफेक होते, तेव्हा मुद्दा हेतूचा तयार होतो. त्यावरची प्रतिक्रिया म्हणून विशिष्ट भागात पुन्हा झुंडीच दुसऱ्या बाजूनं उभ्या राहतात, हेही तितकेच चिंतेचं कारण असलं पाहिजे.

Kolhapur Riots
Sharad Pawar : शरद पवारांच्या केसाला जरी धक्का लागला, तर..; जीवे मारण्याच्या धमकीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

कारवाई झाली पहिजे, असं सरकारमध्ये बसलेलेही म्हणत असतील तर कारवाई कोण करणार आणि त्यांना कारवाईला अडवलं कोणी? कोल्हापुरात दंगल करू पाहणाऱ्यांना पोलिस वठणीवर आणू शकत नाहीत, यावर कोणीच विश्‍वास ठेवणार नाही. मुद्दा पोलिसांना मुक्तपणे कारवाई करू दिली जाईल का? आंदोलन करणाऱ्यांनी या प्रकरणातील स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही कोल्हापूर बंदची हाक दिली. बंद साधारणतः सरकारचं लक्ष वेधण्यासाठी असतो. इथं सरकारही हिंदुत्ववादी म्हणवून घेतं, मग बंद करण्यापेक्षा सरकारला कृती करायला का नाही सागितलं? कोल्हापुरात जमावबंदीचा आदेशही लागू झाला होता. हा सरकारचा आदेश सरकारचे पाठीराखेच कसा काय मोडू शकतात?

राज्यात सत्तेत असलेल्यांचे जिल्ह्यातील प्रतिनिधी जमावबंदी मोडून रस्त्यावर येत असतील तर या मंडळींचा आपल्याच सरकारवर, त्या सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणेवर विश्‍वास नाही काय? कोणत्याही दंगलीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी अधिक पोक्तपणे वागण्याची अपेक्षा असते. त्यांची भाषा या जबाबदारीचं भान दाखवणारी होती काय? हुल्लडबाजीत शहराबाहेरचे तरुण लक्षणीय असल्याचं अनेकांचं निरीक्षण आहे. तणाव असताना असं बाहेरून कोणी येणार नाही, याची दक्षता पोलिस का घेऊ शकले नाहीत?

राज्यात ‘औरंग्याच्या औलादी’ असा उल्लेख केला गेला, त्या फैलावतातच कशा?

बळाचा वापर करतानाही ते कशाची वाट पाहात होते, असे अनेक प्रश्‍न कायम आहेत. हिंदुत्ववाद्याच्या ज्या काही तक्रारी किंवा मागण्या आहेत त्यावर सरकारनं कार्यवाही करायची असते. सरकारही हिंदुत्ववादी आहोत, असं सांगणाऱ्यांचं असताना राज्यात ज्याचा उल्लेख ‘औरंग्याच्या औलादी’ असा केला गेला, त्या फैलावतातच कशा? हिंदुत्ववादी सरकार करतं काय? त्यांचे पोलिस काय करतात, हे प्रश्‍न तर विचारले जाणारच. शिवाय सरकार हिंदुत्ववाद्यांचं असलं तरी सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारचीच आहे.

या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरातील स्टेटस प्रकरण ज्या रीतीनं हाताळलं गेलं तो ढिसाळपणाचा अजब नमुना होता. एकतर औरंगजेबाचं उदात्तीकरण होत असल्याचं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर तातडीनं हालचाली करणं हे पोलिसाचं काम होतं. यातला वेळकाढूपणा ज्यांना या गोष्टींचा लाभ उठवायचा आहे, अशांच्या पथ्यावर पडणाराच होता. जमावबंदी लागू झाल्यानंतर हजारो लोक एकत्र येतात, हे यंत्रणेचं ढळढळीत अपयश आहे.

भीतीचं मार्केटिंग करणारेच दंगल घडवू शकतात

कोल्हापुरातील तणाव असो की, संभाजीनगर, अकोले, नाशिक अशा ठिकाणच्या घटना असोत अशा प्रत्येक वेळी प्रचारी थाट असतो, तो हिंदूंवर काहीतरी गंडातर येतं आहे आणि त्यासाठी प्रतिकार करायला हवा, असली भावनिक आवाहनं परिणाम घडवतात, यात नवं काही नाही. भीतीचं मार्केटिंग करणारेच दंगल घडवू शकतात आणि हे दोन्हींकडून सुरू असतं. कोल्हापुरात प्रश्‍न आहे तो अशा टोकाच्या प्रवृत्तींना लांब ठेवण्याची परंपरा असलेल्या शहरात हे सारं रुजतं कसं? त्यासाठी हळूहळू पण निश्‍चितपणे बदलत चाललेली दिशा ध्यानात घेतली पाहिजे.

Kolhapur Riots
Monsoon Update : मॉन्सून कारवारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी धडकणार? जाणून घ्या महत्वाची अपडेट

एकतर अशा तणावनिर्मितीमागं टोकाच्या प्रवृत्ती असतात. त्यांच्या म्हणून समाजरचनेच्या धारणा असतात आणि त्या अन्य वर्ज्यकेतवर आधारलेल्या म्हणून घटनात्मक सर्वसमावेशकेतपुढं आव्हान तयार करणाऱ्याही असतात. जेव्हा या प्रवृत्तींनी खतपाणी घातलेलं वातावरण मतांच्या बेगमीसाठी उपयोगाचं ठरतं, याचा अंदाज येतो तेव्हा त्यात मुख्य प्रवाहातील राजकारणाचे रंग मिसळतात. यातून जे साकारतं ते अत्यंत जहाल रसायन असतं. ते क्रमशः समाजात भिंती घालायचं काम करतं. कोणत्याच घटनेकडं स्वच्छ नजरेनं पाहता येणार नाही, अशी व्यवस्था केली जाते.

चिकित्सा, विश्‍लेषण यांचं वावडं तयार होतं. ‘इको चेंबरमध्ये’च राहणं पसंत करतील, अशा झुंडी बनवणं हा यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या झुंडीचा भाग झालेले सारासार विचार गमावून बसतात. एखाद्या सिनेमातील तद्दन फिल्मी आणि गल्लाभरू प्रसंग, संवाद वास्तव वाटायला लागतात आणि धर्मरक्षण हेच आपलं कर्तव्य असल्याच्या समजातून रिकामे आणि समाजमाध्यमांतील एकांगी माहितीवर बौध्दिक भरणपोषण झालेले फूटपाड्या दादांच्या हाती मेंदूधुलाईसाठी आपसूक सापडतात.

फलक पाहून दगडफेक कशी होते?

पुरोगामी असल्याचं सतत सांगितलं जाणाऱ्या कोल्हापुरात हे वरवरच्या शांतता आणि सहिष्णुतेच्या आवरणाखाली मूळ धरतं आहे. कोणतीच दंगल अचानक नसते. तत्कालीन घटना पेटवायचं निमित्त असू शकते, पण पेटू शकणारं वास्तव आधीच तयार झालेलं असतं. ज्यांना अचानक शिवाजी चौकात इतके तरुण कसे जमतात आणि हुल्लडबाजी कशी सुरू होते, नेमकी दुकानं, हातगाड्या, रिक्षा एकाच समाजाच्या उलथवल्या कशा जातात, फलक पाहून दगडफेक कशी होते, असे प्रश्‍न पडतात, त्यांनी हेच घडवण्यासाठीची मेंदूधुलाई झालेली आहे, हे वास्तव समजून घ्यायला हवं.

साहजिकच पुरोगामी आणि राजर्षी शाहूंचा वारसा असलेल्या कोल्हापुरात असं का घडल, या प्रश्‍नाइतकंच आता हे घडू शकतं, हे याची बोचरी झलक दिसली आहे, हे महत्त्वाचं आहे. हे बदलायचं कसं यावर अधिक काम करण्याची गरज आहे. तिथं केवळ कोरड्या बुध्दिवादी आणि सैध्दांतिक चर्चा पुरेशा ठरत नाहीत. त्याला सातत्यपूर्ण कार्यक्रमाची आणि लोकभावना, लोकभाषा यांना जोडून घेण्याचीही गरज असते. किमान तीस वर्षांत हळूहळू स्थिर झालेला बदल समजावून घेतला तर त्यांना तोच तो घिसापिटा प्रतिसाद देण्याचा मोह टाळता येईल. यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सामान्य माणूस धर्मश्रध्द असतो, तसं असण्याचा त्याचा अधिकारही आहे.

Kolhapur Riots
Kolhapur Riots : कोल्हापूर दंगलीनंतर पहिल्यांदाच बोलले मुश्रीफ; म्हणाले, औरंगजेब मुसलमानांचा..

समाजात फूट पाडण्याला बळ

आपल्या धर्मावर आघात होतो, असं त्याचं आकलन तयार करणं ही टोकाच्या प्रवृत्तीसाठीची यशाची पहिली पायरी असते. साहजिकच या विचार आणि प्रचारव्यूहारला प्रत्युत्तर देताना धर्म आणि भावनांशी जोडलेल्या प्रतीकांचा विचार अनिवार्य ठरतो. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर हिंदुत्वाच्या राजकारणात होत असेल तर त्याचा प्रतिवाद शिवरायांच्या सर्वसमावेशक कार्याचा जागर करून झाला पाहिजे. औरंगजेबाला मुस्लिमांचं प्रतीक म्हणून उभं करणं समाजात फूट पाडण्याला बळ देणारंच बनतं.

औरंगजेबाचं उदात्तीकरण हा मूर्खपणा

औरंगजेबाचं उदात्तीकरण हा मूर्खपणा आहे. तो करणारे कोणी अल्पवयीन की, जाणीवपूर्वक अल्पवयिनांना वापरणारे याचा विचार न करता याला विरोध केला पाहिजे. तसा स्पष्ट विरोध करणं आणि असली प्रतीकं नाचवण्याला समाज मान्यता देत नाही, हे दाखवत राहणं ही दोन्ही समाजातील विचारी मंडळींची जबाबदारी आहे. धार्मिक तणावापासून बव्हंशी मुक्त या अर्थानं शांत आणि उद्यमशीलता जोडीला दमदार शेती यातून आलेली समृध्दी हा कोल्हापूरचा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळा परिचय.

शांतता-समृध्दी या दोन्ही वैशिष्ट्यांना तडा

शांतता आणि समृध्दी या दोन्ही वैशिष्ट्यांना तडा जात आहे. दरडोई उत्पन्नातील आघाडी हा आता इतिहासाचा भाग झाला आहे. उच्चशिक्षितांना करिअर करता येईल, अशा संधी कोल्हापुरात आहेत, असं वाटत नाही. हे चित्र मागच्या २०-२५ वर्षांत आकाराला आलं आहे, याच काळात तणावमुक्त शांततेला वेठीला धरणारा प्रचार मूळ धरू लागला. स्टेटसवरून झालेला तणाव- दंगल सहिष्णुता, सर्वसमावेशकता त्यातून येणारं सामंजस्यही कोल्हापुरी वैशिष्ट्यं हरवत चालल्याचं निदर्शक आहे.

हिंदुत्ववादाचं राजकारण आणि हिंदू समाज

मुद्दा आहे अशावेळी जुन्या आठवणींचे कढ काढायचे आणि पूर्वासुरींची नावं घेत राहायचं की, स्थिती बदलण्यासाठी काळानुरूप काही कार्यक्रम राबवायचा. यात अल्पसंख्याकात सुरक्षिततेची भावना तयार करताना हिंदुत्ववादाचं राजकारण आणि हिंदू समाज, त्यांच्या भावना यातला फरकही समजून घेतला पाहिजे. अंतिमतः प्रतिवाद आणि प्रतिकार सर्व बाजूंच्या टोकाच्या प्रवृत्तींचा करायचा आहे. एकाचा जोर वाढला म्हणजे दुसऱ्याकडं दुर्लक्ष करण्यातून खदखद वाढते, संपत नाही.

Kolhapur Riots
Kolhapur Riots : कोल्हापुरात दंगल घडली की घडवली गेली; रोहित पवारांच्या मनात वेगळाच संशय

इस्लाम खतरेमें म्हणावं, असंही काही बिघडलेलं नाही

कोल्हापुरात झालं ते वाईट, असं म्हणणारा सूर सार्वत्रिक दिसत आहे. हा विवेकी आवाज कदाचित सायलेंट मेजॉरिटी असेल. या आवाजाला बळ देणं म्हणजेच फूटपाड्या दादांच्या मनसुब्यांना रोखण्याचं पाऊल टाकणं. कोल्हापुरात हिंदूंना धोका वाटावा, असं काहीही घडलेलं नाही. समाजमाध्यमी उठवळपणानं काही बिघडावं इतका हा धर्म लेचापेचाही नाही, तर इस्लाम खतरेमें म्हणावं असेही काही बिघडलेलं नाही. तरीही द्वेषाची भावना पसरवणं ही राजकीय दुकानदारी आहे. त्याला बळी न पडणं म्हणजे शाहूंचा वारसा चालवणं. कोल्हापुरात सामंजस्याचा धागा विसविशीत होत असतानाही सहिष्णुतेची मिठासपुरती संपलेली नाही एवढं तरी दाखवूया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com