esakal | MPSC ने PSI च्या परीक्षा पॅटर्नमध्ये केला महत्वाचा बदल, आता 'असा' करा अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSC ने PSI च्या परीक्षा पॅटर्नमध्ये केला महत्वाचा बदल, आता 'असा' करा अभ्यास

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पोलिस उपनिरीक्षक (PSI) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या पॅटर्नमध्ये (exam pattern for PSI) काही बदल करण्यात आले आहेत. आता शारीरिक चाचणीमध्ये (physical test) १०० पैकी ६० गुण घेणे अनिवार्य आहे. शारीरिकमध्ये ६० गुण नसतील तर तो विद्यार्थी मुलाखतीसाठी (interview) पात्र ठरणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी कशी तयार करायची? याबाबत जाणून घेऊयात. (important changes in mpsc exam for psi post)

शारीरिक चाचणीमध्ये गुणांची अट का?

पोलिस उपनिरीक्षकाला फिल्डवर काम करावे लागते. विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पीएसआय तपास अधिकारी असतो. त्यामुळे त्या अधिकाऱ्याने शारीरिक तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. विद्यार्थी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचून अनुत्तीर्ण होण्यापेक्षा आधीच त्याची शारीरिक क्षमता तपासणे महत्वाचं आहे. शारीरिक चाचणीमध्ये तो अपयशी ठरला तर तो विद्यार्थी दुसऱ्या पर्यायांचा विचार करू शकतो. त्यामुळे ही अट घातली असावी, असे आकार फाउंडेशनचे संचालक राम वाघ यांनी सांगितले.

असा असेल परीक्षेचा पॅटर्न -

पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर शारीरिक चाचणी आणि मुलाखत महत्वाचा भाग असणार आहे. पूर्वपरीक्षा ही १०० गुणांची असते. पीएसआय, एसटीआय या सर्व पदांसाठी ही एकच परीक्षा असते. त्यामधून फक्त मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जाते. हे गुण मुख्य परीक्षेमध्ये ग्राह्य धरले जात नाही. पण, मुख्य परीक्षा वेगवेगळी असते. यामध्ये पदांसंबंधी एक वेगळा पेपर होतो. पीएसआय पदासंबंधी माहिती त्या पेपरमध्ये विचारलेली असते. ही परीक्षा २०० गुणांची असते. त्यानंतर १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत असते. मुख्य परीक्षेचे २००, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे १४० गुण असे एकूण ३४० पैकी निकाल लागत होता. मात्र, आता असे होणार नाही. शारीरिक चाचणीमध्ये ६० गुण घेणं अनिवार्य आहे. तसेच शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज ही अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये कमी गुण मिळाल्यास उमेदवार मुलाखतीला पात्र ठरणार नाही. त्यामुळे शारीरिक चाचणी अंत्यत महत्वाची आहे. तसेच या गुणांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: विद्यापीठाचे अ‌ॅकेडमिक कॅलेंडर बिघडले, विद्यार्थ्यांचे सत्र सहा महिने पुढे

आता पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अशी करा तयारी -

सुरुवातीला विद्यार्थी जास्त लेखी परीक्षेवर लक्ष केंद्रीत करत होते. विद्यार्थी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा संपल्यानंतर शारीरिक चाचणीसाठी सराव करत होते. मात्र, त्यावेळी २० गुण मिळाले तरी मुलाखत आणि मुख्य परीक्षेच्या गुणांमुळे विद्यार्थी उत्तीर्ण व्हायचा. मात्र, आता तसे होणार नाही. आता शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे. आता पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी गेम चेंजर ठरणार आहे. त्यामुळे पीएसआय करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधी शारीरिक चाचणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुख्य परीक्षेची तयारी ८-१० दिवस जास्त अभ्यास करून होऊ शकते. मात्र, शारीरिक चाचणासाठी सुरुवातीपासून मैदानात जाऊन सराव करावा लागेल, असे वाघ यांनी सांगितले.

कोणत्या खेळाला किती गुण -

पुरुषांसाठी

  • गोळा फेक - वजन ७.२६० किलो गुण - १५

  • पुलअप्स गुण २०

  • लांब उडी - १५

  • धावणे (८०० मीटर) - गुण ५०

महिलांसाठी -

  • गोळा फेक - वजन- ४ किलो-गुण -२०

  • धावणे (४०० मीटर) - कमाल गुण-५०

  • लांब उडी - कमाल गुण -५०