१० महिन्यांत ७.७६ लाख गरजूंनी ठोठावला सावकारांचा दरवाजा! यावर्षी २०० कोटींनी वाढले सावकारांचे कर्जवाटप; दुष्काळामुळे बॅंकांनी आखडला हात

१ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या दहा महिन्यांत राज्यातील सात लाख ७५ हजार ६१८ जणांनी कर्जासाठी परवानाधारक खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावल्याची माहिती सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
mantralay
mantralaysakal

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थिती व बॅंकांकडून कर्जवाटपात हात आखडता आणि सिबिल स्कोअरवर बोट ठेवल्याने असंख्य शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात कर्जच मिळालेले नाही. १ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या दहा महिन्यांत राज्यातील सात लाख ७५ हजार ६१८ जणांनी कर्जासाठी परवानाधारक खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावल्याची माहिती सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्यात सध्या दुष्काळी स्थिती असून पाऊस कमी झाल्याने व शेतमालाला चांगला भाव नसल्याने बॅंकांचे पूर्वीचेच कर्ज थकले आहे. त्यामुळे आता बॅंकांकडून नवीन कर्ज मिळत नाही. सिबिल स्कोअर कमी असल्याने अनेकांना कर्ज मिळत नाही किंवा अत्यल्प कर्ज मिळते. या पार्श्वभूमीवर गतवर्षी ११ हजार ५२० खासगी परवानाधारक सावकारांनी राज्यातील साडेसहा लाख कर्जदारांना एक हजार ८४ कोटींचे कर्ज वाटले होते. पण, ही संख्या यंदा वाढली असून अवघ्या दहा महिन्यांतच १२ हजार २९७ सावकारांनी तब्बल सात लाख ७५ हजारांहून अधिक व्यक्तींना एक हजार २८२ कोटी ९३ लाखांचे कर्जवाटप केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र खासगी सावकारी अधिनियम २०१४नुसार खासगी सावकारांना कर्जवाटप करताना तारण व विनातारण कर्जाची टक्केवारी व शेती व बिगरशेती कर्जाचा व्याजदर किती असावा हे नियम घालून दिले आहेत. पण, अनेकजण कर्ज देताना शेतकऱ्यांची अडचण पाहून रेकॉर्डवरील व्याजदर आणि आपापसातील व्याजदर वेगळा ठेवत असल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच तारण म्हणून गहाणखत करून घेतलेली जमीन व्याज व मुद्दलाची रक्कम परत येत नसल्याने परत देत नसल्याचीही उदाहरणे आहेत. त्यातूनच राज्यातील जिल्हा उपनिबंधकांकडे आतापर्यंत दहा हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

दोन वर्षांत ५,७९३ शेतकरी आत्महत्या

राज्यात मागील दोन वर्षांत (१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३) तब्बल पाच हजार ७९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या वर्षात दोन हजार ८५१ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला असून त्यात नाशिक विभागातील २९३, पुणे विभागातील २३, नागपूर विभागातील २९९, छत्रपती संभाजी नगर विभागातील एक हजार ८८ व अमरावती विभागातील सर्वाधिक एक हजार १४० शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यातील साडेपाचशे कुटुंबांची चौकशी सुरु असून तेराशे कुटुंबांना अजूनही मदत मिळालेली नाही.

दोन वर्षातील सावकारी कर्जवाटप

  • सन सावकार कर्जवाटप कर्जदार

  • २०२२ ११,५२० १०८४ कोटी ६.५५ लाख

  • २०२३ १२,२९७ १२८२.९३ कोटी ७.७६ लाख

  • एकूण २३,८१७ २,३६६.९३ कोटी १४.३१ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com