‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’मध्ये जि. प. पिछाडीवर! बाराशे शाळांची अभियानातील नोंदणीकडे पाठ; जिल्ह्यातील ४८५१ पैकी २७६६ शाळांचीच नोंदणी

शाळांमध्ये आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, गुणवत्ता वाढावी, सर्वच उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविले जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अभियानाची मुदत आहे.
Solapur News
Solapur Newssakal

सोलापूर : विद्यार्थ्यांना शाळांमध्ये आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, गुणवत्ता वाढावी, सर्वच उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविले जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अभियानाची मुदत आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या चार हजार ८५१ शाळांपैकी केवळ २७६६ शाळांनीच या अभियानात नोंदणी केली असून, त्यात जिल्हा परिषदांच्या अंदाजे बाराशे शाळांनी सहभाग नोंदवलेला नाही. अभियानात सोलापूर राज्यात शेवटून दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७८८ शाळा असून, खासगी अनुदानितसह इतर माध्यमांच्या दोन हजार ६३ शाळा जिल्ह्यात आहेत. दरम्यान, मराठी शाळांची गुणवत्ता वाढ काळाची गरज असून, दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत असल्याने या अभियानातून त्या सर्व बाबींना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे, अध्ययन-अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरण निर्माण करणे, क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक-परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, कचऱ्याच्या निष्काळजीपणाची सवय मोडणे, राष्ट्रप्रेम-राष्ट्रीय एकात्मतेबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे, शिक्षक, विद्यार्थी, पालकांमध्ये शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. केंद्रप्रमुख, विस्ताराधिकाऱ्यांना सांगूनही शाळांनी अभियानातील नोंदणीकडे पाठ फिरविल्याची स्थिती आहे.

अभियानाची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत

राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मंगळवारी या अभियानाच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या अभियानात सर्वच शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आता अभियानात सहभागी होण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उर्वरित बाराशे शाळा या अभियानात सहभागी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक लाख ते ५१ लाखांपर्यंत बक्षिसे

राज्य सरकारने या अभियानासाठी २० कोटी ६३ लाख रूपयांची तरतूद केली आहे. अभियानात उत्कृष्ट ठरणाऱ्या शाळांना १ लाखापासून ते ५१ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळणार आहेत. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन गटात अभियान आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ३ लाख, द्वितीयसाठी २ लाख, तर तृतीयसाठी १ लाख रुपये, जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस ११ लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख आणि विभागस्तरावर प्रथम २१ लाख, द्वितीय ११ लाख व तृतीयसाठी ७ लाख रुपये, तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५१ लाख, द्वितीय २१ लाख आणि तृतीयसाठी ११ लाख रुपये बक्षिस आहे. तरीदेखील अनेक शाळांनी या अभियानाकडे पाठ फिरविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com