सोलापुरात विरोधकांना ना विरोधी पक्षनेता ना ‘स्वीकृत’ची संधी! उबाठा शिवसेनेसह ‘या’ ११ पक्षांचे सगळेच ३८० उमेदवार पराभूत, वाचा...

आपला महत्त्वाचा उमेदवार पराभूत झाला तर त्यास स्वीकृत म्हणून घेता येईल, अशी आशा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना होती. पण, भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाला स्वीकृत नगरसेवक घेता येईल, अशा जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे यंदा महापालिकेत १० नव्हे, नऊच स्वीकृत नगरसेवक असतील.
Solapur Municipal Corporation

Solapur Municipal Corporation

Sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेत भाजपने १०२ पैकी ८७ जागा पटकावल्या आहेत. दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक अशी रचना आहे. भाजपने जिंकलेल्या जागांमधून नऊ स्वीकृत नगरसेवक त्यांचे असणार आहेत. आपला महत्त्वाचा उमेदवार पराभूत झाला तर त्यास स्वीकृत म्हणून घेता येईल, अशी आशा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना होती. पण, भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाला स्वीकृत नगरसेवक घेता येईल, अशा जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे यंदा महापालिकेत १० नव्हे, नऊच स्वीकृत नगरसेवक असतील.

सोलापूर महापालिकेत भाजपला ८७, एमआयएमला आठ, शिवसेनेला चार आणि काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच जागेवर विजय मिळाला. १० नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येतो. भाजपकडून आता नाराज झालेल्या सच्चा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. आता तिन्ही आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येकी एका कार्यकर्त्याला ‘स्वीकृत’मधून नगरसेवकाची संधी देता येणार आहे. सर्वानुमते आणखी एकास स्वीकृत नगरसेवक करता येणार आहे.

दरम्यान, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनाही आणखी एकदा नगरसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. आता २०२९ पर्यंत शहरात कोणत्याही निवडणुका नसल्याने त्यांना पक्षाकडून ‘स्वीकृत’ची संधी मिळू शकते. दुसरीकडे, प्रभाग १६ मधून पराभूत झालेले माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचाही विचार ‘स्वीकृत’साठी होऊ शकतो.

आमदार कोठेंच्याच पसंतीचा महापौर!

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आमदार देवेंद्र कोठे केंद्रस्थानी होते. त्यांच्या जोडीला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी होते. आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांनीही त्यांच्या मतदारसंघात तगडे नियोजन केले होते. पण, महापालिका निवडणुकीत कोठे यांचा करिष्मा पाहायला मिळाला. प्रचारसभांमध्ये त्यांनी थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सोबत घेऊन अनेक प्रभागांमधील प्रचारात सहभागी झाले. आता पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कोठे ठरवतील तेच महापौर होतील, असे चित्र आहे.

महापालिकेत विरोधी पक्षनेताही नसणार

सोलापूर महापालिकेत १०२ नगरसेवकांमध्ये किमान ११ नगरसेवक ज्या पक्षाचे त्यांचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. मात्र, एमआयएमला आठ जागा असून काँग्रेसला दोन, शिवसेनेला चार व राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव जागा मिळाली आहे. त्यामुळे एकाही विरोधी पक्षाला त्यांचा विरोधी पक्षनेता निवडता येणार नाही, अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे.

पक्ष उमेदवार विजयी

  • भाजप १०२ ८७

  • शिवसेना ५९ ०४

  • राष्ट्रवादी काँग्रेस ५४ ०१

  • काँग्रेस ४८ ०२

  • उबाठा शिवसेना २१ ००

  • श.प.राष्ट्रवादी काँग्रेस १२ ००

  • वंचित बहुजन आघाडी २२ ००

  • एमआयएम २५ ०८

  • बसपा १८ ००

  • आम आदमी पार्टी १२ ००

  • मनसे ०३ ००

  • समाजवादी पक्ष ०४ ००

  • आरपीआय (ए) ०४ ००

  • रासप ०३ ००

  • प्रहार ०२ ००

  • माकप ०६ ००

  • एकूण ३९५ १०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com