
Kirit Somaiya : सोमय्या बातमी प्रकरणी लोकशाही वाहिनीला धक्का! पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश
नवी दिल्ली - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. सोमय्या यांचा व्हिडीओ वाहिनीवर प्रसिद्ध केल्याबद्दल लोकशाही चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती खुद्द लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी इन्स्टाग्रामवर दिली आहे.
इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सुतार म्हणाले, किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वाहिनी आज संध्याकाळी ७ वाजेपासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश वाहिनीला संध्याकाळी ६.१३ वाजता प्राप्त झाले. सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही, असही पोस्टमघ्ये म्हटलं आहे.
इन्स्टाग्रामवरील सुतार यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र त्यांच्या तोंडावर पांढरी पट्टी बांधण्यात आली आहे. लोकशाही चॅनलवर सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध कऱण्यात आला होता. सोमय्या महिलेशी फोनवर व्हिडीओ चॅट करत असल्याचे आरोपही त्यावेळी करण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच निर्णय देण्यात आला आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेणार आहोत. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती, असंही सुतार यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.