सत्तेचा फुगा लवकरच फुटेल - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

इंदापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना १५०० मते जास्त दिली असती; तर मी व ते माजी मंत्री झालो नसतो. आम्ही सत्तेचा घोडेबाजार केला नाही, त्यामुळे आम्ही विरोधात बसलो. मात्र, सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा फुगा  लवकरच फुटेल,’’ असे भाकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इंदापूर - इंदापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना १५०० मते जास्त दिली असती; तर मी व ते माजी मंत्री झालो नसतो. आम्ही सत्तेचा घोडेबाजार केला नाही, त्यामुळे आम्ही विरोधात बसलो. मात्र, सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा फुगा  लवकरच फुटेल,’’ असे भाकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर बाजार समितीने आयोजिलेल्या ‘इंदापूर कृषी महोत्सव २०००’ या पाचदिवसीय कृषी प्रदर्शनाचा समारोप फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले, आम्ही १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. मात्र, सध्या राज्यात सत्तेवर असलेले सरकार शेती, सहकार व शेतकऱ्यांकडे पाहण्यास तयार नाही. त्यांची कर्जमाफी सर्वसमावेशक नसल्याने फसवी आहे. ज्या वेळी आम्ही सत्तेत येऊ, त्या वेळी आम्ही तुम्हा शेतकऱ्यांबरोबर राहू.’’ 

बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले असून, त्यांच्या शब्दास मंत्रालयात महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या १४ मागण्या मंजूर करण्यासाठी आणि शेतकरी निवास बांधण्यासाठी २५ ते ३० लाख रुपये मिळवून  द्यावेत.’’

या वेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, जालिंदर कामठे, पुष्पा रेडके, अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, रंजन तावरे, मंगेश पाटील, भरत शहा, नानासाहेब शेंडे, कृष्णाजी यादव, माउली चवरे, तानाजी थोरात, मुरलीधर निंबाळकर आदी उपस्थित होते. रघुनाथ पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिन भाग्यवंत यांनी आभार  मानले. 

विद्यमान सरकारचे बंगले, दालने, खाती व पालकमंत्रिपदाचे वाद सहा महिन्यांत मिटणार नाहीत. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालेल; तितके दिवस आम्ही सक्षम विरोधक म्हणून काम करू. 
 - देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री

सलग ३ वर्षे कृषी प्रदर्शन घेऊन इंदापूर बाजार समितीने आपला ब्रॅंड तयार केला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
- हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Agricultural Exhibition in Indapur