फसवणूक करणारे ‘एजंट’ नेते नामानिराळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

‘दलाल एजंटांचा शोध घ्या’
प्राप्तिकर विभागाने रिफंडची बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर कामगारांना नोटिसा पाठविल्या, तेव्हा भंडाफोड होण्याची शक्‍यता दिसू लागताच बऱ्याच कामगार नेत्यांनी पुढे होऊन कामगारांना त्यांनी बुडविलेले पैसे भरण्याची गळ घालत स्वतःची मान सोडवून घेतल्याची चर्चा आहे. प्राप्तिकर विभागाने साहाय्यक आयुक्त दर्जाच्या धनराज महाले यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली. त्यात, एक हजार ८८८ कामगारांपर्यंत टोळीला पोचविणारे दलाल कोण, याचा उलगडा झाला असावा. आता कामगारांना चुकीचे रिफंड भरायला प्रवृत्त करणारे दलाल एजंट कोण, त्यांनी किती उखळ पांढरे करून घेतले याची चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी होत आहे.

नाशिक - प्राप्तिकर विभागाला खोट्या माहितीद्वारे परतावा (रिफंड) मिळविण्यासाठी गंडविण्याच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल एक हजार ८८८ जण फसल्याचे पुढे आले. या सगळ्यांना फसवणूक करणारी एकच व्यक्ती असल्याचे दिसते. सूत्रधारापर्यंत कामगारांना पोचविण्यात ज्या कामगार पुढाऱ्यांचा हात होता, असे सगळे दलाल पुढारी नामानिराळे आहेत. त्यामुळे सूत्रधार शोधला; पण दलालांची टोळी कधी शोधणार, हा प्रश्‍न कायम आहे.
प्राप्तिकर रिफंड गैरव्यवहार एप्रिल महिन्यापासून उजेडात आला आहे.

बंगळूरच्या मुख्यालयाला खोटे कागदपत्रं पाठविणारी टोळी कार्यरत होती. प्रतिभूती मुद्रणालय, चलार्थपत्र मुद्रणालय, ‘एचएएल’, ‘मायको’सह विविध शासकीय- निमशासकीय व खासगी आस्थापनातील ज्या कामगारांना प्राप्तिकराचा मोठा भुर्दंड बसणार आहे, असे कामगार शोधण्याचे महत्त्वाचे काम करण्यासाठी पाटील याचे या आस्थापनांमध्ये जाळे होते. प्रेसमध्ये कुठल्या कामगारांना भुर्दड येणार प्राप्तिकरातून वाचविण्यासाठी कोण कोण इच्छुक आहे याविषयी सविस्तर माहिती संशयित पाटील याला मिळायची. त्यासाठी प्रेसचे काही पुढारीच आघाडीवर होते. २० टक्के मोबदल्यात काम करणाऱ्या पाटीलकडून कामगार पुढाऱ्यांना २० टक्केतील भागीदारी मिळत असावी, असाही संशय व्यक्त होत आहे. 

दरम्यान, पाटील हा अभियंता असून करसल्लागाराचे काम बेकायदा करीत असल्याचे सांगण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income tax refund malpractice Cheating Agent Leader