न्यायालयावर दबावाच्या घटना वाढीस - न्या. हेमंत गोखले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई - खटला सुरू असताना त्याबाबत बाहेर चर्चा, भाष्य करणे तसेच न्यायालयावर दबाव आणण्याच्या घटना घडत आहेत. असा दबाव म्हणजे न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखेच आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी केले. 

मुंबई - खटला सुरू असताना त्याबाबत बाहेर चर्चा, भाष्य करणे तसेच न्यायालयावर दबाव आणण्याच्या घटना घडत आहेत. असा दबाव म्हणजे न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखेच आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी केले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

"मुक्त शब्द' मासिकातर्फे विलेपार्ले येथील केशवराव घैसास सभागृहात झालेल्या चौथ्या मेरी पाटील स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. सर्व घटकांत प्रगती झाल्यावरच समाजाची प्रगती होते. न्यायालये कधीच समाजसुधारणेच्या आड येत नाहीत. न्यायालये या प्रक्रियेला मदतच करतात, असे न्या. गोखले म्हणाले. यासंदर्भात त्यांनी स्त्रियांच्या हिताचे कायदे, तिहेरी तलाक रद्द, मंदिर प्रवेश अशी अनेक उदाहरणे दिली. समाजहितासाठीच कायदा असतो; मात्र विरोधक वेगळेच सांगतात. न्यायालयाने आपल्याला सोईस्कर निकाल द्यावा, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. न्यायालयाने वस्तुस्थिती आणि कायदा यांच्या आधारावरच निःपक्षपाती निर्णय दिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

आदिवासींना शिक्षणाचा हक्क आणि घटनादत्त अधिकार मिळवून देण्यासाठी लढणारे भामरागड येथील ऍड्‌. लालसू सोमा नोगोटी आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी उज्ज्वला बोगामी यांना या वर्षीचा मेरी पाटील स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ऍड्‌. लालसू यांनी आदिवासी बोली, संस्कृती याबाबत माहिती दिली. भाषावार प्रांतरचनेमुळे माझी मातृभाषा मराठी लावली गेली; मात्र माझी मातृभाषा माडिया आहे. हीच बाब देशाच्या मध्यवर्ती भागातील आदिवासींबाबत घडली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा, तेलंगणा या राज्यांतील आदिवासींची मातृभाषा ते राहत असलेल्या प्रदेशानुसार ठरवली गेली. या प्रक्रियेत आदिवासींची मूळ भाषा, संस्कृती, त्यांची राहणी याचा विचार झालाच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

आदिवासींचे वास्तव्य असलेल्या भागात संपर्क, संवादाची साधने अत्यंत कमी आहेत. त्यामुळे त्यांच्या राहणीबद्दल, गोटुल संकल्पनेबद्दल अजूनही गैरसमज आहेत, असे ऍड्‌. लालसू सोमा नोगोटी यांनी सांगितले. या बाबींचा विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

Web Title: Increasing pressure on the Court says Justice Hemant Gokhale