Independence Day : ध्वजवंदन जेव्हा ड्युटी बनते..!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई - सर्वसामान्यपणे स्वातंत्र्य दिन आणि आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. मात्र आपल्यातील एक घटक दररोज नित्यनेमाने देशाला वंदन करत झेंडा फडकवत असतो. तो घटक म्हणजे शासन दरबारी असलेला चतुर्थ श्रेणी कामगार. वर्षातील 365 दिवस हे मानकरी ध्वजवंदन करत असतात. ऊन, वारा पाऊस काहीही असो, त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे झेंडा फडकतच असतो. 15 ऑगस्ट 2018 या दिवशीही सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी सूर्योदयाला राज्याचे शासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयावर राष्ट्रध्वज फडकणार आहे.

रोज ध्वजवंदन करणे आणि सूर्यास्ताला तो ध्वज सन्मानाने खाली घेणे हे त्यांचे काम आहे. या सन्मानाच्या कार्यासाठी राजेंद्र कानडे यांच्या सोबत अन्य पाच कर्मचारी आहेत. सकाळची वेळ गाठण्यासाठी दोन कर्मचारी मंत्रालयातच वास्तव्य करतात. मंत्रालयात जेव्हा 12 जून 2012 रोजी आग लागली होती, तेव्हा याच कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून मंत्रालयावरील ध्वज उतरवला होता. या घटनेची आठवण सांगताना कानडे म्हणाले, की आम्ही नेमके कोणत्या विभागाचे कर्मचारी आहोत हे सरकारमधील भल्याभल्यांना माहीत नसते. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आहोत. आमची ड्युटी इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नसते. पहाटे पाच वाजता आमची ड्युटी सुरू होते. आग लागली त्यावेळेस मंत्रालयावर फडकत असलेला झेंडा उतरवायचा की नाही, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये बराच खल झाला, या आपत्कालीन स्थितीत काय करावे हे अधिकाऱ्यांना कळत नव्हते. आम्ही मात्र ठाम होतो. अखेर परवानगी मिळाल्यावर झेंडा सुरक्षितपणे उतरवला. सध्या कानडे यांच्यासह ज्ञानेश्वर वारगडे, सुरेंद्र जाधव, सूर्यकांत कसबे आणि जयसिंग मकवाना हे कर्मचारी झेंडा फडकवण्याची जबाबदारी सांभाळत आहेत.

या कामाचा आनंद आणि अभिमान काही औरच असतो. रोज ध्वजवंदन करणे आणि सूर्यास्ताच्या वेळी तोच ध्वज खाली उतरविणे हे काम करताना कधीच कंटाळा येत नाही.
- राजेंद्र कानडे, मंत्रालयातील कर्मचारी

मंत्रालयावर फडकत असलेल्या ध्वजाचा आकार 14 बाय 21 फूट एवढा आहे. जवळच समुद्र असल्याने पावसाळ्यात जोराचा वारा वाहत असतो, या वेळी ध्वज फडकवणे अतिशय धोकादायक असते. हा ध्वज फडकवण्यासाठी चार व्यक्तींची गरज असते. खराब झेंडे एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट गाडीतून मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेले जातात. विशिष्ट पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जाते.

Web Title: Independence Day Mantralaya