बलाढ्य चीनला हादरा देऊ शकतो सोलापूरचा "हा' उद्योग; पण..!

श्रीनिवास दुध्याल 
Friday, 3 July 2020

जगाच्या वस्त्रोद्योगाशी तुलना केल्यास भारत पाचव्या स्थानावर आहे. आताची परिस्थिती ही बांगलादेश, व्हिएतनाम या देशांकडून कमी मजुरी दरात उत्पादने घेऊन वस्त्रोद्योग निर्यातीतील बादशहा बनलेल्या चीनला मागे खेचण्यासाठी पोषक आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनवर बहिष्कार घातलेले देश आपल्या दारापर्यंत येऊन उत्पादनांची मागणी करणार नाहीत. तेव्हा सरकारने भारतीय दूतावासांमार्फत प्रयत्न करावेत. 

सोलापूर : संपूर्ण जगाला "कोव्हिड-19'च्या दुष्टचक्रात ढकललेल्या चिनी ड्रॅगनविरुद्ध जगभरात असंतोष खदखदत आहे. चीनविरुद्ध अनेक देश एकवटत आहेत. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरही हा ड्रॅगन हल्ला चढवत आहे. त्याला थाळ्यावर आणण्यासाठी भारतानेही कंबर कसली असून, चिनी मोबाईल ऍपवर बंदी आणून दणका दिला आहे. आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योगाची उत्पादने निर्यातीत चीन जगात प्रथम क्रमांकावर आहे. सध्या तरी सर्व देश चिनी उत्पादनांना पर्याय हुडकत आहेत. तेव्हा या संधीचा फायदा घेऊन सोलापूर युनिफॉर्म हब असलेला गारमेंट तसेच यंत्रमाग उद्योग चीनला दणका देऊ शकतात; पण भारत सरकारने तसे धोरण आणून प्रयत्न करायला हवेत. 

हेही वाचा : अक्कलकोटमध्ये जनता कर्फ्यूचा निर्णय, मात्र "या' महासंघाचा विरोध 

संपूर्ण जगाला टेक्‍स्टाईल उत्पादने पुरवण्यात चीनचा वाटा 61.69 टक्के आहे. चीन जगभरात 157.8 मिलियन डॉलरची टेक्‍स्टाईल उत्पादने निर्यात करतो. त्यानंतर दुसरा क्रमांक युरोपियन युनियनचा (147.5 बिलियन डॉलर), तिसरा क्रमांक बांगलादेश (32.5), चौथा क्रमांक व्हिएतनाम (31.5) व पाचवा क्रमांक भारताचा लागतो (16.6). यानंतर टर्की, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, कंबोडिया व यूएसए यांचा क्रमांक लागतो. आता कोरोनामुळे जगाला चीनच्या उत्पादनांची ऍलर्जी झाली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगातील उत्पादनेच नव्हे तर चीनच्या इतर उत्पादनांनाही मागणी घटत आहे. त्याचा फायदा भारताला उचलता येणार आहे. सोलापूरच्या गारमेंट उद्योगाने सलग चार वर्षे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचे आयोजन करून जगाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मागणी वाढत आहे. आता कोरोनामुळे चीनच्या वस्त्रोद्योगाला दणका देऊन भारतीय वस्त्रोद्योगाने चीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची हीच योग्य वेळ आहे. 

हेही वाचा : स्मार्ट सिटी कामाच्या दर्जाबाबत नागरिकांना काय वाटते? ते वाचा 

मात्र, ही संधी चालून आली तशी आंतरराष्ट्रीय ग्राहक भारतातील उत्पादकांकडे चालत येणार नाहीत. त्यासाठी भारतीय दूतावासांमार्फत त्या-त्या देशांतील मागणी लक्षात घेऊन, तेथील ग्राहकांना भारतीय उत्पादनांची माहिती देऊन त्यांना भारतीय उत्पादने खरेदी करण्यासाठी ऑफर दिल्यास चीनच्या वस्त्रोद्योगाला जबरदस्त हादरा बसू शकतो. ही संधी सोडली तर इतर देश आहेतच, आपल्यापेक्षा आधी पोचून तेथे बस्तान बसवतील. त्यासाठी भारताने वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत. डिजिटल मार्केटिंग सुरू केले पाहिजे. 

चीनला मागे खेचण्यासाठी परिस्थिती पोषक
याबाबत सोलापुरातील गारमेंट असोसिएशनचे संचालक अमित जैन म्हणतात, जगाच्या वस्त्रोद्योगाशी तुलना केल्यास भारत पाचव्या स्थानावर आहे. आताची परिस्थिती ही बांगलादेश, व्हिएतनाम या देशांकडून कमी मजुरी दरात उत्पादने घेऊन वस्त्रोद्योग निर्यातीतील बादशहा बनलेल्या चीनला मागे खेचण्यासाठी पोषक आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनवर बहिष्कार घातलेले देश आपल्या दारापर्यंत येऊन उत्पादनांची मागणी करणार नाहीत. तेव्हा सरकारने भारतीय दूतावासांमार्फत प्रयत्न करावेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India can reduce China dominance in the international textile industry